लोहारा परिसरात पाणीटंचाई बरोबरच भीषण चाराटंचाई

0

पशूंचा प्रतवारी दर्जा खालावला, पशु पालकांच्या अडचणीत वाढ

लोहारा, ता. पाचोरा :– ग्रामीण भागात शेतीबरोबर पशुपालनाचा जोडधंदा शेतकऱ्यांचा असतो हा धंदा यंदा दुष्काळी परिस्थितीमुळे अडचणीत सापडला आहे. हिरवा सकस चारा मिळत तर नाही पण कोरडा चारा मिळणेही अवघड झाले आहे. यामुळे गाय, म्हैस, बकरी, बैलजोडी आदी पशूंची प्रतवारी दर्जा खालावला असून शेतकऱ्यांना पशुपालनासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे.

पाऊस चांगल्या प्रकारे झाला तर पर्यायी चारा म्हणून पशुपालक इतर चारा उपलब्ध करायचे पण यंदा पावसाने पर्जन्यमान दिवसातच पाठ फिरवल्याने नदीनाले यांना अल्प प्रमाणात पाणी आले. हे पाणी काही दिवसातच सुकले यातूनच विहिरींना पाणी अल्प प्रमाणात आले. जिल्ह्यात यंदा कमी पावसाने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तरीही पशुपालक हे पशुधन टिकवण्यासाठी तारेवरची कसरत आतापर्यंत करत आले पण आता वेळेवर गुरांना पाण्याबरोबर कोरडा चारा मिळणेही मुश्किल झाले आहे. त्यात पावसाळा लांबणीवर झाला व उशिराने यंदा पाऊस कमी होणार असे भाकीत हवामानशास्त्र विभागाकडून वर्तविले जाते यामुळे शेतकऱ्यांचे होश अधिक उडू लागले आहे. कारण साठवून ठेवलेला कडबा, गंडोरी, कुट्टी, भूस चारा लवकर संपणार चारा संपला तर गुरे कोणत्या खाद्यावर जगायची? भविष्यात पशुपालनाचा जोडधंदा कसा करायचा? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. तरी शासनाने जळगाव जिल्ह्यातही ग्रामीण भागात चारा व पाणी छावण्या यांची सोय करायला हवी, अशी मागणी होत असताना शासनाने याकडे साफ दुर्लक्ष केले. बाकी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीचा विचार करता मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत छावण्यांची बिले त्वरित अदा करा असे आदेश देण्यात आले आहे.

सतत तीन वर्षापासून दुष्काळसदृश्य परिस्थिती असताना जळगाव जिल्ह्याचा चारा छावण्यांमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. म्हणजेच शेजारच्या घरी पुरणपोळीचे जेवण असा प्रकार खान्देशवासीय शेतकऱ्यांबाबत झाला. वेळेवर चारा व पाणी गुरांना मिळू शकत नसल्याने आता तरी शासनाला जाग येईल काय? असा प्रतिप्रश्न शेतकऱ्यांमधून शासनकर्त्यांना उपस्थित केला जात आहे. कारण अतिदुष्काळी समस्यांनी जळगाव जिल्हा होरपळत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.