लालखडी-अकोली रेल्वेलाईन वरील उड्डाणपुलासाठी ११५ कोटी मंजूर

0

 अमरावती (प्रतिनिधी):  अमरावती शहरातिल पायाभूत रस्ते विकासाबरोबर अपघात विरहित वाहतुकीच्या दृष्टीने आमदार सुलभाताई खोडके यांच्या पुढाकाराने शहरातील मुख्य रस्ते त्याचबरोबर शहरातून जाणारे जिल्हा प्रमुख मार्ग, राज्यमार्ग, महामार्ग आदी मार्गांना नवी चकाकी आली आहे. शहरात सर्वदूर  काँक्रीट  रस्त्याचे जाळे पसरले असतांना  त्यात रस्ताच्या दुतर्फा असलेल्या सौंदर्यीकरणाने  विशेष  भर घातली आहे. विकासाच्या याचशृंखलेत आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विकासाची दूरदृष्टी ठेवून अमरावतीकरांना आणखीन एका उड्डाणपुलाची भेट दिली आहे. नुकत्याच झालेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय  बजेटमध्ये आमदार सुलभाताई खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या नरखेड रेल्वे लाईनवर चारपदरी रेल्वे उड्डाणपूल बांधकामाकरिता ११५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.

अमरावती विधानसभा मतदार संघातिल पश्चिम वळण मार्ग रस्ता हा शहराबाहेरून जाणारा एक महत्वपूर्ण राज्यमार्ग आहे. एकूण १४.५० किलोमीटर लांबीचा हा रस्ता अमरावती शहराला जोडला गेला असल्याने शहरालगतच्या लालखडी, सुकळी, लसणापूर, लोनटेक, पिपरी, अकोली, चांदुरी, आदी गावातील नागरिकांना याच मार्गावरून अवागमन करावे लागते. या रस्त्यावरच नरखेड रेल्वे लाईनचे रेल्वे क्रॉसिंग असून तेथे छोटा भूमिगत पूल देखील आहे. मात्र या रस्त्यावरून मोठी वाहतूक करणे शक्य नसल्याने स्थानिक परिसर वासियांना यवतमाळ – नागपूर – अकोला – परतवाडा या भागाकडे जाण्या येण्याकरिता मोठी अडचण निर्माण झाली आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंग वर सुद्धा सिग्नल दरम्यान प्रचंड वाहतुकीची कोंडी निर्माण होतांना दिसत आहे . त्यामुळे या भागातील जड वाहतूक ही  पर्यायाने अमरावती शहरातून जाणाऱ्या मार्गावरून होत असल्याने  शहरवासियांना अनियंत्रित वाहतूक व गर्दीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. हि बाब हेरून आ. सौ. सुलभाताई खोडके यांनी विकासाची दूरदृष्टी बाळगून नरखेड रेल्वेलाईनवर चार पदरी उड्डाण पूल साकारल्यास ही  अनियंत्रित वाहतूक सुरळीत होऊन येथून जड वाहतूक करणेही सोईचे असल्याची संकल्पना आखली. व आपल्या या संकल्पनेला कृतीची जोड देऊन अमरावती विधानसभा मतदार संघातून जाणाऱ्या नरखेड रेल्वे लाईनवर चार पदरी रेल्वे उड्डाण पूल साकारण्यासाठी निधी उपलब्धीला घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे प्रस्ताव सादर केला. अमरावती शहराबाहेरील पश्चिम वळण रस्त्यावर रेल्वे उड्डाण पुलाची नितांत गरज असून सदर पूल साकारल्यास यवतमाळ, नागपूर, अकोला, परतवाडा कडील वाहतूक ही अमरावती शहराच्या बाह्य मार्गातून करता येईल. त्यामुळे शहरांतर्गत रस्त्यांवर  वाहतुकीचा  भार कमी होऊन नागरिकांना अपघाताचे विरहित वाहतुकीची सोय होईल. ही बाब आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी ना. अजितदादा पवार यांना  पत्राद्वारे निदर्शनास आणून  याबाबत उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री महोदयांना पत्र देखील दिले . नुकत्याच झालेल्या वर्ष २०२१-२२ च्या  राज्याच्या बजेटमध्ये दळणवळण व वाहतुक सेवा विस्तारण्यावर भर देण्यात आल्याने आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी अमरावती विधानसभा मतदार संघातुन जाणाऱ्या नरखेड रेल्वे लाईन वर चार पदरी रेल्वे उड्डाणपूल बांधकामासाठी ११५ कोटींचा निधी मंजूर करून आणला आहे.  या कामाला प्रशासकीय मान्यता सूध्दा मिळाली आहे. सदर बाबीला प्रशासकीय मान्यता मिळाली असल्याचा उल्लेख अर्थसंकल्प विषयक निवेदन (नवीन बाबी) वर्ष २०२१ -२२ च्या यादीतील जोडपत्र-२ (एच-१) या पानावरील दुसऱ्या क्रमांकावर उल्लेखित आहे. या निधी अंतर्गत अमरावती शहराबाहेरील पश्चिम वळण मार्ग रस्ता चौपदरी रेल्वे उड्डाण पुलाने कात टाकणार असून शहराच्या रस्ते विकास व सौंदर्यीकरणात भर पडणार आहे. आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या सात्यत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अमरावतीसाठी बजेटमध्ये भरपूर काही देण्यात आले. बेलोरा विमानतळ, विदर्भ महाविद्यालयाचा विकास, तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता आदी घोषणा करण्यात आली. तसेच नरखेड रेल्वे लाईन वर चार पदरी रेल्वे उड्डाणपूल बांधकामासाठी ११५ कोटी रुपये  देखील मंजूर झाले आहे. याबद्दल आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजितदादा पवार तसेच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव  चव्हाण यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.