राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांचे सुशोभीकरण करा

0

जळगाव –
राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांची शहरात दैना झाली आहे. 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर तरी निदान या स्मारकांचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी निवेदनाद्वारे महापौर सिमा भोळे व मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांच्याकडे केली आहे.
शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. पुतळ्याच्या सभोवताली असलेल्या चौथर्‍याची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीमुळे पुतळा विटंबनाची घटना घडू शकते, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
धोकेदायक डीपी हटवा
स्मारकाजवळच धोकेदायक स्वरुपात डीपी आहे. कार्यक्रमादरम्यान अप्रिय घटना घडू शकते. त्यामुळे ही डीपी त्वरित हटविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. स्मारकाशेजारीच गटारीचे घाण पाणी वाहत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरते परिसरात चहा टपर्‍या, गुटखा, पानसुपारीची, तसेच पेपरची दुकाने आहेत. रिक्षा स्टॉपमुळेही स्मारकाशेजारी अतिक्रमण होते. पुतळ्याला हार घालण्यासाठी क्रेनचा वापर करावा लागतो. त्यासाठी कायमस्वरुपी व्यवस्था व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
शिवस्मारकाची दुरावस्था
मेहरुण तलाव परिसरातील शिवाजी उद्यानातील शिवस्मारकाची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे तेथे सुशोभीकरण करणे गरजेचे झाले आहे. दैनंदिन साफस्वच्छतेचाही त्या ठिकाणी अभाव दिसून येतो.
रेडक्रॉस समोरील
स्मारकाची दैना
इंडियन रेडक्रॉस सोसायटी इमारतीसमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान बुद्ध यांच्या स्मारकाची दैना झाली आहे. परिसरातील बांधकाम हे नागरिकांनी स्वखर्चाने केले आहे. मात्र त्या ठिकाणी सुशोभीकरण आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सदर स्मारकाच्या संरक्षणाची कोणतीही व्यवस्था नाही. सध्या बेवारस स्थितीत हे स्मारक आहे. त्यामुळे या स्मारकाला सुशोभीकरणासह संरक्षणाचीही व्यवस्था करण्यात यावी, तसेच ख्वॉजा मिया
दरगाह परिसरातील आंबेडकर उद्यानातही सुशोभीकरण करावे, अशी मागणी बहुजन क्रांती मोर्चातर्फे करण्यात आली आहे. येत्या 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या आधी सदर स्मारकांचे सुशोभीकरण करण्यात यावे, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शहराध्यक्ष सुनिल देहाडे, सुकलाल पेंढारकर, विजय सुरवाडे, नारायण सोनवणे, सतीश इंगळे, नितीन अहिरे, योगेश तायडे, राजु सोनवणे, राजश्री अहिरराव, दिपाली पेंढारकर, इंदू मोरे, राधा धनके, वैशाली महाले आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.