राज्यात 5051 कोटींची गुंतवणूक; 9 हजार जणांना मिळणार नोकऱ्या..

0

मुंबई, लोकशाही नेटवर्क 

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहे. मागील दोन वर्षांपासून कोरोनाची मुकाबला करत ठाकरे सरकारला चांगलीच कसरत करावी लागली. पण, आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे राज्य सरकार कामाला लागले आहे. राज्यात आज तब्बल 5051 कोटी गुंतवणूक करार  करण्यात आले आहे. या करारांमुळे 9 हजार जणांना नोकरीची नवी संधी मिळणार आहे. दुबई वर्ल्ड एक्स्पोच्या अभूतपूर्व यशानंतर उद्योग विभागाने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा वेग कायम ठेवला असून आज विविध 11 कंपन्यांसोबत सुमारे 5051 हजार कोटींचे सामंजस्य करार करण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली.

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र २.०  या उपक्रमांतर्गत एकूण 1.88 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करून 3 लाख 34 हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करण्यात राज्य यशस्वी ठरले आहे. आज झालेल्या 12 सामंजस्य करारातून राज्यात 9000 पेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण होतील’, असा विश्वास देसाई यांनी व्यक्त केला.  ‘गुंतवणूक करार पूर्णत्वास येण्यासाठी उद्योग विभागाने कंबर कसली आहे. या गुंतवणुकीद्वारे राज्यांचा सर्वांगिण औद्योगिक विकास साधण्यात येणार आहे.

त्यामुळे आज झालेल्या करारातून संरक्षण, अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, जैव-इंधन, इलेक्ट्रीक वाहन निर्मिती, निर्यात प्रधान उद्योग, अन्न प्रक्रिया, स्टील, इथेनॉल, औषध निर्माण आदी क्षेत्राला चालना मिळणार आहे. या गुंतवणूकदारांमध्ये ग्रासिम इंडस्ट्रिज, सोलार एव्हीएशन, पद्मावती पेपर्स, देश अग्रो, डी डेकॉर या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

अनेक दशकांपासून महाराष्ट्र राज्य औद्योगिकरणात आघाडीवर आहे. राज्याने आपल्या पायाभूत सुविधांचा वेग वाढविला असून शासनाच्या कृतिशील धोरणामुळे आणि प्रगतीशील दृष्टिकोनामुळे कोरोना काळातही राज्यात औद्योगिक गुंतवणूकीचा ओघ सतत वाढता ठेवला आहे’, असंही देसाई म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.