राज्यात 31 मार्चपर्यंत लॉक डाऊन

0

मुंबई : देशासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य सरकारने अनेक निर्णय घेतले आहे. राज्यात 31 मार्च पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आला आहे. ही जमावबंदी नगर पंचायत क्षेत्रापर्यंत लागू असेल. कोणीही या काळात घराबाहेर अत्यावश्‍यक कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.

खासगी व्यावसायिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातून वगळण्यात आलेल्या संस्था : बॅंकिंग आणि फायनान्स, दूध, धान्य, फळे, भाजीपाला यांची वाहतूक करणाऱ्या संस्था, आयटी व आयटीइएस, हॉस्पिटल्स, बंदरे, विमान, इलेक्‍ट्रॉनिक आणि प्रिंट मिडिया, फोन आणि इंटरनेट सेवा, औषधे आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तूंची गोदामे.

भाजीपाला आणि अन्य जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर तसेच अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर स्टिकर्स लावण्यात येतील. तसेच आजपासून सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची पाच टक्के उपस्थिती असेल. त्या कर्मचाऱ्यांना पासेस देण्यात येतील. अत्यांत जड अंत:करणाने हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे त्यांनी सांगितले. या काळात वेळेचा गैरफायदा उठवण्यासाठी काळाबाजार करू नये. मंदिरात पुजा अर्चा करावी मात्र भाविकांची गर्दी करू देऊ नये असे आवाहन त्यांनी केले. ज्या अन्य राज्यांतून बाधित येण्याची शक्‍यता आहेत अशा राज्यांच्या सीमा सील करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकांनी मीच माझा रक्षक हा मुलमंत्र लक्षात ठेवावा, स्वयंशिस्त हाच कोरोनाच्या लढ्यात यशाचा मूलमंत्र आहे. लोकांनी कोरोनाच्या कोविड 19 या विषाणूंबाबत शिक्षित व्हावे आणि स्वत:चा बचाव करताना देशाचाही बचाव करावा असे आवाहन त्यांनी केले.

सध्या राज्यात 75 जण बाधीत असून दोन जणांचा मृत्यू झालेला आहे. अद्याप सामुहिक संसर्ग सुरू झाला नसून घाबरू नये. अद्याप राज्यातील स्थिती दुसऱ्या टप्प्प्यातच आहे. राज्यात गेल्या 24 तासांत 10 जण पॉझिटिव्ह आढळले असले तरी त्यातील सहा जण संपर्कातील होते तर चार जण हे परदेशांतून आलेले होते. तसेच ही वाढ फार मोठी नाही. त्यामुळे लोकांनी घाबरू नये. मात्र काळजी घ्यावी, असे ते म्हणाले.

राज्यात आतापर्यंत 1876 जणांची चाचणी घेण्यात आली. त्यातील 1592 निकाल निगेटिव्ह आले. तर 74 पॉझिटिव्ह आले. 210 चाचण्यांचे निकाल अद्याप बाकी आहेत, असे ते म्हणाले. परदेशांतून येणारी विमाने बंद झाल्याने यापुढे होम क्वारंटाईनची बाब फारशी येणार नाही, असे ते म्हणाले.

जगभरात आढळून आलेल्या गोष्टीप्रमाणे पहिल्या 30-35 दिवसांनंतर रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ होते. बाधितांच्या संख्येत गुणाकार होतो. तो होऊ नये म्हणून 30 दिवस संपण्याआधी काळजी घेणे आवश्‍यक आहे. राज्याच्या हितासाठी ते आवश्‍य आहे. म्हणजे अशी वाढ आली तरी ती फारशी येणार नाही, यासाठी ही उपाय योजना करण्यात येत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.