राज्यपाल नियुक्त जागांसाठी एकनाथ खडसेंचं नाव वादात, आमदारकी नाकारणार?

0

मुंबई  : ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपाला रामराम करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. खडसे यांची राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत वर्णी लागली आहे. परंतु, त्यांच्या नावाला सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी राज्यपालांची भेट घेऊन विरोध दर्शवला आहे.

 

एकनाथ खडसे यांचं नाव राष्ट्रवादीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी पाठवण्यात आले आहे.  सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 1 नोव्हेंबर रोजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली आणि त्यांनी एकनाथ खडसे यांचा नावाला विरोध केला. खडसेंचं नाव यादीत येणे हे संतापजनक आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. भ्रष्टाचारी नेत्याला पुन्हा एकदा राजकारणात आणले जात आहे. खडसे हे पुन्हा जर राजकारणात सक्रीय झाले तर भ्रष्टाचाराविरोधी लढ्याला काही अर्थ राहणार नाही, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

 

तसंच, एकनाथ खडसे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार केली होती, पण त्यांच्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. त्यामुळे कोर्टात आणखी लढा द्यावा लागणार आहे.  खडसे यांच्याविरोधात आणखी पुरावे गोळा करणार असून ते राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे देणार आहे, असंही दमानिया यांनी सांगितले.

 

दरम्यान, राज्यपाल नियुक्त आमदारांची यादीत कुणाचे नाव वर्णी लागावे यासाठी गेल्या काही दिवसांपासून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार बैठका सुरू होत्या. अखेर तीन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळाच्या बैठकीत नावांना मान्यता देण्यात आली. यात 12 नावे असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून ही यादी तयार केली आहे. यात अनेक नवीन चेहरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. पण, यात काही जणांना डच्चू देण्यात आला आहे.

 

काँग्रेसकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरू होती. पण, या शर्यतीतून अचानक त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी दिली जाणार अशी चर्चा रंगली होती. पण, तशी शक्यताही नाकारण्यात आली. तर दुसरीकडे शिवसेनेकडून अभिनेते शरद पोंक्षे यांचे नाव पुढे आले  तर काँग्रेसमधून अभिनेत्री रेणुका शहाणे यांना संधी देण्याची मागणी करण्यात आली होती. पण, संभाव्य उमेदवारींची यादी आता पूर्ण झाली असून चर्चेतील नावांना वगळण्यात आले आहे.

 

अखेर ही यादी आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपालांकडे देणार आहे.  मुख्यमंत्र्यांनी राज्याचे महाधिवक्ता यांचा सल्ला घेऊन ही यादी तयार केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.