ये गणराया… सगळी विघ्ने दूर कर!

0

विघ्नहर्त्या गणरायाचे आज उत्साहात आगमन होत असले तरी त्या उत्सवावर कोरोनाचे सावट आहे. घराघरात गणपतीची मनोभावे पूजा अर्चा करण्यावर कसलेही बंधने नाहीत. तथापि सार्वजनिकरित्या धूम-धडाक्यात उत्सव साजरा करण्यास मनाई आहे. मोठमोठाले गणेश मूर्तीच्या स्थापनेवर बंधने असून गणेश मंडपात रांग लाऊन गणेशाच्या दर्शनावर सुध्दा बंदी घालण्यात आलेली आहे. कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी, गर्दीला रोख लावण्यासाठी शासनाला नाईलाजास्तव ही बंदी घालावी लागते आहे.

गणराया तुझ्या स्थापनेच्या 10 दिवस उत्सव साजरा करतांना कोरोनाची बाधा होऊ नये म्हणून ही बंधने घातली आहेत. त्याकरिता गणराया या कोरानाचेच उच्चाटन करून हे विघ्न दूर व्हावे हीच यानिमित्त विघ्नहतर्त्यापुढे प्रार्थना. आम्ही सर्वजण मनोभावे तुझी पूजा-अर्चा, प्रार्थना करून हे विघ्न दूर करण्याची मागणी करतोय. गणेशाच्या या आगमनानिमित्त देशावर महाराष्ट्रावर तसेच आपल्या जिल्ह्यावर आलेले कोरोनाचे संकट दूर होऊ दे. त्याचबरोबर यंदा जळगाव जिल्ह्यावर निसर्गाचीही अवकृपा झाली आहे. सुरूवातीला पावसाने दडी मारली. तहानलेली पिके पावसाच्या प्रतिक्षेत होती. तेव्हा पाऊस आला नाही आणि आता ढगफुटीसदृष्य पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले. चाळीसगाव तालुक्यात आठ दिवसांपूर्वी हाहाकार माजला पुराच्या पाण्याने तालुक्यातील अनेक घरे उध्वस्त झाली. शेतीतील खरीपाचे पिक धुव्वाधार पावसाने वाहून गेली. जे पिक शेतकऱ्यांच्या तोंडाशी आले होते त्या शेतकऱ्यांच्या तोंडाशी आले होते. त्या शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पावसाने हिरावून घेतला. शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली. औट्रम घाटात 7 ठिकाणी दरडी कोसळल्या. आठ दिवस झाले अद्याप औट्रम घाट वहातुकीसाठी सुरू झाला नाही. चाळीसगावहून कन्नड गोताळा घाटातून जाणाऱ्या मार्गातही दरड कोसळल्याने तोही घाट मार्ग वहातुकीसाठी बंद झाला. आठ दिवसानंतर पुन्हा चाळीसगाव तालुक्यातील मन्याड धरण परिसरात ढगफुटी सदृष्य पाऊस झाल्याने धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे गिरणा नदीला पूर आल्याने नदी काठावरील गावांना पुराचा धोका निर्माण झाला. नदीकाठच्या शेतातील पिकाची दैना झाली. शेती पिकाचे मोठे नुकसान झाले. त्याच दिवशी म्हणजे तीन दिवसांपूर्वी जिल्हाभरात मुसळधार पाऊस झाला. विशेषत: जामनेर तालुक्यात ढगफुटीसदृष्य पाऊस आणि त्यासोबत वादळामुळे शेतातील पिकांबरोबर अनेक घरांची पडझड झाली. अनेक घरातील पत्रे उडाले. अनेक लोक बेघर झाले. शहरातून वहाणारी कांग नदी यंदा पहिल्यांदाच कोपली. नदीवरील पूल पाण्याखाली गेला. घराघरात कांग नदीचे पाणी घुसले. जिल्हाभरात इतर तालुक्यातही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी आता शासनस्तरावर तसेच सार्वजनिक पातळीवर मदत चालू आहे.

भारतासारख्या खंडप्राय देशात सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. प्रत्येक जण आपआपल्या धर्माच्या चालीरितीनुसार सण -उत्सव साजरे करतात. भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या घटनेनुसार धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून भारताची जगात ओळख असून लोकशाहीची अंमलबजावणी करणारा भारत सर्वात मोठा देश आहे. या देशातील विविध जाती धर्माचे साजरे होणारे सण उत्सवाला गणराया गालबोट लावू देऊ नको. आज सर्वांच्याच सण – उत्सवावर शासनाने मर्यादा घातलेल्या आहेत. त्या मर्यादेत राहून सण उत्सव साजरे होतात. परंतु राजकारणाच्या स्वार्थापोटी राजकारणी मंडळीकडून चिथावणी देण्यात येते ती व्हायला नको. मंदिरे हे त्या त्या धर्मांचे श्रध्दास्थान आहे. प्रत्येकाला मंदिरात जाऊन आपल्या देवाचे दर्शन घेण्याचा अधिकार आहे. तो लोकशाहीत सर्वांचा हक्क असला तरी काही कठीण प्रसंगात महाराष्ट्रातील महाविकास आघाडीने कोरोनाचा प्रार्दुभव रोखण्यासाठी काही निर्बंध लावली आहेत.

कोरोनाचा प्रार्दुभाव संपला की मंदिरे सुरू होणारच आहेत. आपल्या मनात श्रध्दा असली, मनातून त्याची पूजा अर्चा केली तरी बरेच काही साध्य होते हे सांगण्याची गरज आहे असे वाटत नाही. त्यामुळे मंदिरे उघडी करण्यासाठी आंदोलन करून भाविकांच्या भावनेशी खेळ होऊ नये. त्यातन तणावसदृष्य परिस्थितीमुळे जाती – धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे गणराया तुझ्या आगमनानंतर तू या सर्वांना सद्बुध्दी दे हीच तुझ्याजवळ प्रार्थना. आता आगामी 10 दिवसात तुझ्या स्थापनेनंतर तुझी मनोभावे भाविक पूजा – अर्चा करतील. त्यासाठी तू सगळ्यांचे विघ्न सर्व प्रकारची दु:ख दूर कर एवढीच तुझ्या चरणी प्रार्थना.

Leave A Reply

Your email address will not be published.