‘या’ ठिकाणी आढळला दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सर्प

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव शहरातील सत्यम पार्क येथील नागरी रहिवासात  वन्यजीव अधिनियम १९७२ अंतर्गत सूची एकमध्ये संरक्षण प्रदान केलेला निमविषारी भारतीय अंडीखाऊ सर्प (इंडियन एग इटर) हा सर्प सुरक्षित रेस्क्यू  करण्यात आला. त्याला मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या निगराणीत सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला.

घरात साप असल्याचा कॉल वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र गणेश सोनवणे यांना आला. त्यांनी तात्काळ सत्यम पार्कला धाव घेतली. दरम्यान सर्प अंगणात असलेल्या कढीपत्याच्या झाडावर जाऊन बसला. शोध घेतला असता सर्प दिसून आला नेहमी पेक्षा वेगळा वाटल्याने सोनवणे यांनी त्याचे निरीक्षण केले असता तो भारतीय अंडीखाऊ सर्प असल्याचे जाणवले. त्या सर्पाला सुरक्षित रित्या रेस्क्यू करून संस्थेच्या रेकॉर्डला नोंदी साठी त्याचे छायाचित्र घेऊन वनविभागाच्या निगराणीत सुरक्षित ठिकाणी मुक्त करण्यात आले.

वन्यजीव संरक्षण संस्थेने १० वर्षात २१ भारतीय अंडीखाऊ सर्प वाचवून सुरक्षित अधिवासात सोडले आहेत.  ही २२ वी नोंद ठरली. पूर्वी शहराचा विस्तार आजच्या इतका नसल्याने झाड-झुडपे ,मोकळी मैदाने खूप होती, शेती शिवार मुबलक होते, बांधावरील लहान मोठ्या झाडांवर बुलबुल, मुनिया, सुगरण, नर्तक, चिमणी, सुभग, होला या सारखे पक्षी घरटी करून राहत असत. त्यांची अंडी खाऊन हा सर्प आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी धडपडत आहे.

परंतु या झाडांची कत्तल, कपाशी, तूर, भेंडी, सारख्या पिकांवरील कीड, अळ्या खाण्यासाठी सोयीचे ठरते म्हणून शिंपी पक्षी, सुर्यपक्षी शेतातच घरटी करत.आता शेतात रासायनिक फवारणी होत असल्याने या पक्षांनी शेतांकडे पाठ फिरवली असल्याचे चित्र आहे. त्याच बरोबर शेताचे बांध पेटवले जात असल्याने भारतीय अंडीखाऊ सर्पाच्या अधिवसाला धोका पोचत असल्याचा निष्कर्ष संस्थेच्या अभ्यासकांनी काढला आहे असे वन्यजीव संरक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांनी सांगितले.

गाय रान, माळरान सारख्या पक्षांच्या अधिवसाला अनुकूल जागा आणि शहरातील मोकळ्या जागा यावरील झुडपे नष्ट करून वसाहती बांधल्या जात आहेत. याचा परिणाम पक्षी आणि सरीसृपांच्या अधिवासावर होत आहे. तर नैसर्गिक कुंपणाच्या जागी फेनसिंग पद्धती वाढत असल्याने गेल्या ५ वर्षात या सर्पांचे प्रमाण खूपच कमी झाल्याचे दिसून येत आहे. कारण हा सर्प फक्त पक्षांची अंडी खाऊनच जगतो या सर्पा वर फारसा अभ्यास झाला नाहीये.

 

Leave A Reply

Your email address will not be published.