मोदींच्या भ्रष्टाचार मुक्ततेला भाजपकडूनच हरताळ

0

अकार्यक्षम, मर्जीच्या अधिकार्‍यासाठी 5 लाख जनतेच्या आरोग्याशी खेळ- अनंत जोशी

जळगाव दि. 6-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ना खाऊंगा ना खाने दुंगा या भ्रष्टाचारविरोधी तत्वाला जळगाव भाजपानेच हरताळ फासला आहे. एकमुस्त ठेक्याअंतर्गत 75 कोटीचा मलिदा खाण्यासाठी व अकार्यक्षम अधिकार्‍यांचा हट्ट पुर्ण करण्यासाठी जळगावच्या 5 लाख जनतेच्या आरोग्याचा खेळ मांडून भाजपा शहराचे वाटोळे करणार, असा घणाघाती आरोप शिवसेनेचे गटनेते अनंत जोशी यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला. यावेळी नगरसेवक प्रशांत नाईक उपस्थित होते.
मनपात अधिकार्‍यांची वानवा आहे. बाहेरील अधिकारी यावयास तयार नाहीत जे प्रामाणिकपणे काम करत आहेत. आर्थिक फायद्यासाठी त्यांचेच खच्चीकरण भाजपाकडून होत आहे. नगरसेवक सचिन पाटील यांनी उदय पाटील यांच्या शैक्षणिक पात्रतेचा विषय काढला मात्र सगळ्याच विभागात शैक्षणिक पात्रता पुर्ण न करणारे अधिकारी आहेत. प्रभाग अधिकारी विलास सोनवणी, संजय पाटील, भास्कर भोळे, सुशिल साळुंखे, विधी अधिकारी किरण भोळे, लेखा परिक्षक चंद्रकांत वांद्रे, वाहन विभाग प्रमुख सुनिल भोळे, नगरसचिव सुनिल गोराणे, सुनिल मोरे हे अधिकारी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता पुर्ण करत नाहीत. असे असताना आरोग्य अधिकार्‍यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेणे म्हणजे प्राप्त निविदेतून स्वत:च्या मर्जीतील ठेकेदाराला ठेका देवून टक्केवारी अथवा भागीदारी हाच उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अन्यथा मनपाला कुलुप ठोकावे
भाजपाची सत्ता येवून 6 महिने उलटल्यावर एकमुस्त ठेका निविदेच्या अंतिम टप्प्यात उदय पाटलांची शैक्षणिक पात्रका का आठवली? सत्ताधारी भाजप व नगरसेवक सचिन पाटील यांनी मनपाच्या महत्वांच्या पदांवरील नियुक्त अधिकार्‍यांच्या शैक्षणिक पात्रतेचा खुलासा करावा. त्यांच्या बदल्या कधी करणार मनपाचा कारभार कसा करणार याचा खुलासा करावा अथवा मनपाला कुलुप ठोकावे. ज्या अधिकार्‍याची चौकशी करुन बडतर्फ करावे असा ठराव असताना स्वत:च्या फायद्यासाठी त्याच अधिकार्‍याला पुन्हा आरोग्य अधिकारी करण्याचे कारण काय? असा सवाल जोशी यांनी विचारत तत्कालीन ठरावाची प्रतच सादर केली. त्याचप्रमाणे बहुमताच्या जोरावर हवे असलेले ठराव तुम्ही मंजूर करुन घेतात पण विरोधक म्हणून यापुढे सेनेला योग्यरित्या भुमिका मांडू दिली नाही. विरोधकांच्या अधिकारावर गदा आणली तर सेना भाजपाचा माज उतरवेल, असा सज्जड दमही त्यांनी भाजपाला भरला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.