मोठी बातमी.. मलिकांना हायकोर्टाचा दणका! वानखेडे प्रकरणी दिले ‘हे’ निर्देश

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राष्ट्रवादी काँग्रसेचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसांपासून एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या कुंटुबियांवर आरोपांची मालिक सुरु केली होती. पत्रकार परिषद आणि सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबाविरोधात नवनवे आरोप केले जात होते. पण आता हायकोर्टानेच नवाब मलिक यांना दणका दिला आहे.

मुंबई हायकोर्टाने दिलेले निर्देश

आगामी सुनावणीपर्यंत नवाब मलिक सोशल मीडियावर वानखेडे कुटुंबियांबाबत काहीही पोस्ट करणार नाही अशी हमी नवाब मलिकांच्या वकिलांनी कोर्टात दिली आहे. नवाब मलिक- ज्ञानदेव वानखेडे प्रकरणाची सुनावणी आज द्विसदस्यीय खंडपीठासमोर झाली. याची पुढील सुनावणी 9 डिसेंबरला होणार आहे. तोपर्यंत वानखेडे कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतंही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्य केलं जाऊ नये असं मुंबई हायकोर्टाने सांगितलं आहे.

वानखेडे कुटुंबियांकडून मानहानीचा दावा
नवाब मलिक यांनी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर जात प्रमाणपत्रावरुन संशय व्यक्त करत आरोप केला होता. याप्रकरणी समीर वानखेडे यांचे वकिल ज्ञानदेव वानखेडे यांनी कोर्टात धाव घेत मानहानीचा दावा दाखल केला होता. आपल्या कुटुंबाविरोधात करण्यात येणाऱ्या वक्तव्यावर बंदी घालावी अशी दाद त्यांनी कोर्टात मागितली होती.

आज सकाळीच मलिकांकडून नवा आरोप
त्याआधी आज सकाळी नवाब मलिक यांनी वानखेडे कुटुंबावर नवा आरोप केला. समीर वानखेडे यांचं कुटुंबीय मुस्लिम असल्याचा आणखी एक पुरावा नवाब मलिक यांनी समोर आणला. वानखेडेंच्या आई झायदा वानखेडे यांच्या मृत्यूनंतर त्यांना ओशिवरा कब्रस्तानात दफन करण्यात आलं. त्यासाठी त्या मुस्लिम असल्याचं प्रमाणपत्र कब्रस्तानात देण्यात आलं. मात्र अवघ्या एका दिवसांत म्हणजे १७ एप्रिलला मनपात मृत्यूनोंद करताना त्या हिंदू असल्याची नोंद करण्यात आली. ही दोन कागदपत्र नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.