मुख्य जलवाहीनीचे काम युध्दपातळीवर करा – नगराध्यक्ष करण पाटील

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क 

पारोळा शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहीनी विचखेडा गावाजवळ फुटल्याने शहराला होणारा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. यासाठी न. पा.  कर्मचाऱ्यांनी  सर्वोतोपरी प्रयत्न सुरू करुन जलवाहीनीचे काम युध्द पातळीवर करुन शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सुचना पारोळा लोकनियुक्त नगराध्यक्ष करण पाटील यांनी कर्मचाऱ्यांना  केल्या आहेत. याबाबत कर्मचाऱ्यांचा मोठा फौजफाटा मुख्य जलवाहीनी दुरुस्तीसाठी लागला असुन लवकरात लवकर पाईप लाईनचे काम सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

यावेळी शहराला होणारा पाणीपुरवठा एक ते दोन दिवस उशिराने होईल,  म्हणून  नागरिकांनी पाण्याचा वापर जपुन करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

शहरात केला जाणारा पाणीपुरवठा हा बोरी धरणातुन पाईपलाईनद्वारे विचखेडा येथुन होवुन तो पालिकेच्या महामार्गालगत असलेल्या पाण्याच्या टाकीवर पंपींगद्वारे पोहच होतो.

मात्र विचखेडा  गावाजवळील मुख्यजलवाहीनी फुटल्याने पाणीपुरवठ्यास मोठा अडथळा निर्माण झाल्याचे लक्षात आल्यावर नगराध्यक्ष करण पाटील यांनी शहराचा पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत व्हावा यासाठी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या.  यावेळी पालिकेचे पाणीपुरवठा अभियंता पंकज महाजन, नगराध्यक्ष स्वीय सहाय्यक कैलास पाटील, परेश चौटे, सोनु चौधरी, गोविंद पाटील व कर्मचारी यांनी युध्दपातळीवर कामाला सुरुवात केली असुन यावेळी पाणीपुरवठा सुरळीत करणेकामी कर्मचारी सर्वोतोपरी प्रयत्न करित आहे.

शहर वासियांना वेळेवर व मुबलक प्रमाणात पाणीपुरवठा कसा होईल.  याबाबत पालिका नियोजन करित आहे. तरी देखील तांत्रिक दृष्ट्या अडथळा निर्माण झाल्यास नागरिकांनी पाण्याचा वापर जपुन करावा,  असे आवाहन नगराध्यक्ष करण पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.