मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला पदभार

0

मुंबई: शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल गुरुवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आज मंत्रालयात जाऊन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्विकारण्याआधी उद्धव ठाकरेंनी हुतात्मा स्मारकावर जाऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी मंत्रालयाबाहेर समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या सरकारचं नेतृत्व उद्धव ठाकरे यांच्याकडं आलं आहे. संसदीय राजकारणापासून दूर असलेल्या ठाकरे घराण्याची व्यक्ती प्रथमच मुख्यमंत्रिपदावर येत आहे. त्यामुळं शिवसेनेसह संपूर्ण महाराष्ट्रात एक वेगळंच कुतूहल आहे. उद्धव ठाकरे पदभार स्वीकारण्यासाठी मंत्रालयात पोहोचले तेव्हा त्याची प्रचिती आली.आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचले. तत्पू्र्वी, त्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केले. आजपर्यंत इतरांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवणाऱ्या ठाकरे कुटुंबातील व्यक्ती स्वत: या पदावर येत असल्यानं मंत्रालयातील कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. त्यामुळंच उद्धव ठाकरे मंत्रालयात पोहोचताच त्यांना पाहण्यासाठी, त्यांची छबी मोबाइल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची प्रचंड झुंबड उडाली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.