महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन? कोरोनासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

0

मुंबई – राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे.

…तर राज्यात कठोर लॉकडाऊन  

कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत.  मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.