महापालिका पाणी पुरवठा विभागाचा गलथान कारभार!

0

45 अंश डिग्री सेल्सीयस तापमानाने जळगावकर नागरीक त्रस्त झाले असतांना गेल्या आठ दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे. जळगावकरांना भर उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. नैसर्गिक पाणी टंचाई असली तर त्यावर मात करण्यासाठी नागरीक सज्ज असतात. महानगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे अचानक पाणी पुरवठ्याचे नियोजन कोलमडते तेव्हा नागरीकांचा संताप अनावरण होणे सहाजिकच आहे. जळगाव शहराला पाणी पुरवठा होणार्‍या वाघुर धरणात पुरेसा पाणीसाठा असतांना केवळ महापालिकेच्या गलथानपणामुळे जळगावकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. ही दुर्देवाची बाब म्हणावी लागेल. एैन उन्हाळ्यात पाणी पुरवठ्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने संपूर्ण जळगाव शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला. एका दिवसात म्हणजे 24 तासात पाईपची दुरुस्ती होण्याऐवजी तब्बल 50 तास दुरुस्तीसाठी लागले. त्यामुळे संपूर्ण शहरात पाण्यासाठी हाहाकार निर्माण झाला. दोन दिवस आड नळाला पाणी येत असल्याने तिसर्‍या दिवशी पाणी आले नाही तर सर्वत्रच पाण्याचे हाल होतात. शहरात जिकडे तिकडे खाजगी बोरींगवरून अथवा विहिरीवरून पाणी भरण्यासाठी पाण्याचे हंडे घेवून माता भगिनींना भटकंती करावी लागली, इतकेच नव्हे तर महापालिकेच्या रुग्णालयात चार महिलांची प्रसृती पाण्याअभावी लांबवावी लागली. गरोदर महिला आणि तिच्या बाळाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार नव्हे का? त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाले असते तर त्याला जबाबदार कोण? महापालिका रुग्णालयात असलेले पाण्याच्या टाक्या कोरड्या ठक्क पडल्याने पाण्याअभावी तेथील डॉक्टरांनी प्रसृती लांबविण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, पाण्यासाठी महापलिकेच्या अग्निशमन कार्यालयाला फोन केला असता, तेथे फोन कोणीही उचललाच नाही. त्यामुळे टॅकरद्वारे रूग्णालयाला पाणी मिळू शकले नाही. अग्निशमन दलाच्या या गलथान कारभाराची चौकशी करून योग्य ती कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे, उन्हाने अंगाची लाही लाही होत असतांना कोठे आगीची घटना घडली. आणि अग्निशमन कार्यालयाला फोन केला आणि त्याला प्रतिसाद मिळाला नाही तर आगीत सर्वकाही जळून भस्म होईल. त्यानंतर वरातील मागून घोडे अशाप्रकारे अग्निशमनचे टॅकर तेथे पोहचले तर ते काय कामाचे? तोच अनुभव महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांना आला. गरोदर महिलाची प्रसृती पाण्याअभावी लांबविण्यात आल्याची ही पहिलीच घटना म्हणता येईल.
गेल्या वर्षभरात पाणी पुरवठा होणार्‍या मुख्य पाईपलाईन सहा वेळा फुटली. जेव्हा जेव्हा मुख्यपाईप लाईन फुटते तेव्हा त्याच्या दुरुस्तीसाठी लागणार्‍या कालावधीत शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होतो. पाईपलाईन फुटल्यानंतर त्याची दुरुस्ती युध्दपातळीवरून करण्यात येते. परंतु गेल्या आठवड्यात फुटलेल्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्याला तब्बल 50 तासाचा कालावधी लागतो. ऐवढा कालावधी लागण्याचे कारण काय? याबाबत चौकशी केली असता दुरुस्ती करण्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग तेथे नव्हता. तो का नव्हता याची चौकशी सुध्दा होणे आवश्यक आहे. तसेच वारंवार पाईपलाईन का फुटते याया कारणाचा शोध घेणे आवश्यक आहे. या फुटण्यामागे कुणाचा स्वार्थ तर दडला नाही ना? याचाही शोध घेणे आवश्यक आहे कारण भाजप नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात तसा आरोप केलेला आहे. पाईप लाईन दुरुस्तीचे काम ज्या ठिकाणी करण्यात येते तेथील रस्त्याचे मोठ्या प्रमाणात झालेल्या खोदकामामुळे तीन तेरा होतात. वाहनचालकांना त्या रस्त्यावरून जातांना जो त्रास होतो तो वेगळाच अनेक वेळा दुचाकींना अपघातही झालेला आहे. यासंदर्भात जळगाव शहराचे आ.सुरेश भोळे यांनी महापालिका प्रशासनाला जाब विचारला आहे. आमदार म्हणून महापालिका प्रशासनाला पत्र देवून केवळ जाब विचारून चालेल का? आमदारांचे पत्र महापालिकेत गेल्यानंतर अनेक कारणे देवून त्या पत्राचे उत्तर दिले जाईल. ऐवढ्याने महापालिका प्रशासनात गतीमानता येणार नाही. 24 तासात होणार्‍या पाईपलाईन दुरुस्तीला 50 तास का लागले? त्याला जबाबदार कोण? त्याचेवर प्रशासकीय कारवाई झाली तरच महापालिकेच्या गलथान कारभारात सुधारणा होईल अन्यथा येरे माझ्या मागल्या चालूच राहिल.
वाघुर धरणात जळगावकरांना दररोज पाणी पुरवठा करता येईल ऐवढा पुरेसा पाणी पुरवठासाठा असतांना महापालिकेकडे पाणी वितरणाची योग्य सुविधा किंवा क्षमता नसल्यामुळे एक दिवसा आड नव्हे तर दोन दिवसा आड जळगावकरांना नळाने पाणी पुरवठा केला जातो. वाघुर धरणात सहा वर्षापूर्वी पाणीसाठा अपुरा होता. तेव्हा तब्बल 5 दिवस आड पाणी नळाने देण्यात येत होता. परंतु त्या काळात जळगाव शहरातील विविध भागात कुपनलिकाद्वारे जळगावकरांना पाणी मिळत होते. परंतु गेल्या पाच वर्षात या कुपनलिका बंद अवस्थेत पडून आहेत. कारण या कुपनलिकांना लागणारे साहित्यच गेल्या पाच वर्षात महापालिकेने खरेदी केलेले
नाहीत. त्यामुळे कुपनलिकेद्वारे होणारा पाणीपुरवठा सध्या होत नाही. गेल्या आठवड्यात पाण्याचा हाहाकार झाला तेव्हा या कुपनलिकांची नगरसेवकांपासून ते सर्वांना आठवण झाली कुपनलिका चालु असत्या तर पाण्यासाठी जळगावकरांना हाल भोगावे लागले ते झाले नसते. महानगरपालिकेचे प्रशासन करते काय? याची सुध्दा चौकशी व्हायला पाहिजे. मे महिना अजून संपायचा आहे, उन्हाची तीव्रता अजून कमी झालेली नाही. जुन महिन्यात सुध्दा पाणी टंचाई भासू देता कामा नये, त्यासाठी अजून सव्वा महिना उष्णतेची धग कायम राहणार आहे.
यंदा पावसाळा लवकर असल्याची भविष्यवाणी वर्तविली जात आहे. हवामान खात्यानेही तसाच अंदाज वर्तविला आहे. त्यांची भविष्यवाणी खरी ठरो हीच प्रार्थना आपण करूया.

Leave A Reply

Your email address will not be published.