महाजनांचा पराभव करत औकात दाखवण्यासाठी नाथाभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थ

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

माजी मंत्री गिरीश महाजन यांनी काल जळगावात एकनाथ खडसे यांनी आपल्या मतदारसंघाकडे पहावे, मतदारसंघ सांभाळावा आणि मगच इतर ठिकाणच्या विजयाचे दावे करावेत अशी टीका केली होती. या टीकेला प्रसिद्धी पत्राद्वारे प्रतीउत्तर देत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे आ. गिरीष महाजनांना जिल्हापरिषद निवडणुकीत देखील औकात दाखवू असा इशारा देण्यात आला आहे.

राष्ट्रवादी पक्षाने प्रसिद्ध केलेले पत्र

जिल्हा बँकेत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस यांच्या सहकार पॅनेलने बहुमताने दणदणीत विजय मिळवला. त्यामुळेच भाजपचे गिरीष महाजन यांची राज्यभरात नाचक्की झाल्याने महानगरपालिका सत्तांतर प्रकरणानंतर उरली सुरली अब्रूही गेल्याने नाथाभाऊंना डीवचण्याचा प्रयत्न करून स्वतःलाच खाजवून खरूज करून घेतांना दिसत आहे .

जिल्हा बँक निवडणुकीत सर्व जागांवर भाजपतर्फे खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, माजी आमदार, माजी पालकमंत्री, विविध प्रदेश व जिल्हा पदाधिकारी असे सक्षम उमेदवार देण्यात आले होते. सदर निवडणूक बिनविरोध होऊन पराभवाची नाचक्की टाळता यावी याकरिताच गिरीष महाजन व भाजपचे इच्छूक उमेदवार नाथाभाऊंच्या मागे तिन तिन वेळा फिरत होते. पण निवडणुकीत गिरीष महाजन व त्यांचे तमाशा मंडळाला नाथभाऊंनी जी नामुष्की ओढवुन घेण्यास बाध्य केले तो पराभव जिव्हारी लागल्यामुळेच मुक्ताईनगर नगरपालिका व कोथळी ग्रामपंचायत नाथाभाऊंच्या ताब्यात नसल्याचे सांगत फिरत गिरीष महाजन वलग्ना करत आहेत.

परंतु मुक्ताईनगर नगरपालिका एकट्या नाथभाऊंनी स्वतःच्या बळावर बहुमताने निवडून आणली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षा अपात्र झाल्याने आजदेखील मुक्ताईनगर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मनीषा प्रवीण पाटिल व कोथळी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. नारायणदादा चौधरी हे नाथाभाऊंच्या सक्षम नेतृत्वाखाली काम करीत आहेत. ज्या जिल्हा परिषद बाबत गिरीष महाजन फुशारक्या मारत आहेत, ती सुध्दा नाथाभाऊंच्या जीवावर आजपर्यंत ताब्यात आहे.

जळगाव शहर महानगरपालिकेत भाजपची सत्ता ज्या प्रकारे नाथभाऊंनी उलथवून लावली व भाजपचे संख्याबळ 57 हुन 27 वर आणले व महाराष्ट्रात गिरीष महाजनांची उरली सुरली ईज्जत देखील पायदळी तुडवली. त्यापेक्षाहि येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती व दुध विकास फेडरेशन अशा सर्वच ठिकाणी गिरीष महाजन यांचा पराभव करून त्यांना त्यांची औकात दाखवून देण्यासाठी नाथाभाऊ व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी समर्थ आहे.

जे जिल्हा बँक निवडणुकीत तालुक्यातील निवडणूक लढवू शकले नाही, ते इतर निवडणुकीत टिकाव धरू शकतील का ? असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे. जिल्हा बँक निवडणुकीमुळे सध्या भाजपची गत सर्वच निवडणुकीतून ” भागो भागो ” अशी झालेली आहे . जिल्हा परिषद निवडणुकीत देखील भाजपला भागो भागो केल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे सक्षम नेते नाथाभाऊ राहणार नाही असा ठाम विश्वास आमचा नाथाभाऊंवर आहे. त्यांनी हा आमचा विश्वास वेळोवेळी दाखवून दिलेला आहे.

असे पत्रक राष्ट्रवादी काँग्रेस महानगर जळगाव तर्फे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, सुनील माळी, अमोल कोल्हे, किरण राजपूत, विशाल देशमुख, सुशील शिंदे, डॉ. रिजवान खाटिक, सुहास चौधरी, अकिल पटेल, नईम खाटिक, राहुल टोके, अनिल पवार आदि पदाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीस दिलेले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.