मनोज लोहारासह सहकार्‍याला जन्मठेप

0

जि.प.सदस्याला डांबून ठेवणे भोवले : 16 जणांच्या नोंदविल्या साक्षी

जळगाव दि. 19-
चाळीसगाव येथील तत्कालीन जि. प. सदस्य तसेच आयुर्वेदीक महाविद्यालयाचे संस्थापक व प्राचार्य डॉ. उत्तमराव धनाजी महाजन यांना डांबून ठेवल्या प्रकरणी तत्कालीन अपर पोलीस अधिक्षक मनोज लोहार व त्यांचे सहकारी धीरज यशवंत येवले यांना शनिवारी जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व 5 हजार रुपये दंड , दंड न भरल्यास 1 महिना कारावासाची शिक्षा न्यायाधीश पी .वाय. लाडेकर यांनी सुनावली तर तत्कालीन स.पो.नि. विश्वासराव निंबाळकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
तत्कालिन जि. प. सदस्य डॉ.उत्तमराव महाजन यांच्याविरुध्द आलेल्या तक्रार अर्जावरुन गुन्हा दाखल न करणे तसेच संस्थेतील गैरकारभार बाहेर येवू देणार नाही यासाठी मनोज लोहार यांनी तत्कालिन उपनिरीक्षक विश्वासराव पाटील व धीरज येवले यांच्या माध्यमातून डॉ. महाजन यांच्याकडे 60 लाखाची खंडणी मागितली होती. तडजोडीअंती 25 लाख रुपये देण्याचे निश्चित झाले होते. खंडणी दिली नाही म्हणून लोहार यांनी डॉ. महाजन यांना 30 जून 2009 रोजी डांबून ठेवत दुसर्‍या दिवशी 1 जुलै रोजी दुपारी सुटका केली होती. त्यानंतर 16 जुलै 2009 रोजी मनोज लोहार, विश्वास निंबाळकर व धीरज येवले या तिघांविरुध्द चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता.
16 जणांच्या नोंदविल्या साक्षी
या गुन्ह्याचा तपास पूर्ण झाल्यानंतर 2012 मध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. न्या. पी. वाय. लाडेकर यांच्यासमोर सर्व साक्षीदारांच्या साक्षी झाल्या. यात 16 साक्षीदार तपासण्यात आले. फिर्यादी डॉ.उत्तमराव महाजन, मनोज महाजन, डॉ.महाजन यांचे सासरे पांडूरंग माळी, तत्कालीन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी, या खटल्याला मंजूरी देणारे गृहविभागाचे अवर सचिव देशमुख व लिपीक नितीन जाधव यांचा समावेश आहे.
खटल्यात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड.केतन ढाके यांनी कामकाज पाहिले तर लोहार यांच्यावतीने अ‍ॅड.निलेश घाणेकर औरंगाबाद व अ‍ॅड. सुधीर कुळकर्णी जळगाव यांनी, विश्वास निंबाळकर यांच्यावतीने अ‍ॅड. आर. के. पाटील, धीरज येवले यांच्यावतीने अ‍ॅड. सागर चित्रे, मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. पंकज अत्रे व अ‍ॅड. अविनाश पाटील यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.