भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्लीपुढे हैदराबादची शरणागती

0

हैदराबाद :– किमो पॉल आणि कागिसो रबाडा यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला ३९ धावांनी पराभूत केले आणि सलग चौथा सामना जिंकला. कॉलिन मुनरो (४०) आणि कर्णधार श्रेयस अय्यर (४५) यांच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्लीने हैदराबादला सामना जिंकण्यासाठी १५६ धावांचे आव्हान दिले होते. धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादचा संघ ११६ धावांत गारद झाला. रबाडाने सर्वाधिक ४ बळी टिपत ‘पर्पल कॅप’ मिळवली.

हैदराबादच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात करून दिली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो या दोघांनी मिळून आठव्या षटकात संघाचे अर्धशतक पूर्ण केले. पण त्यानंतर बेअरस्टो झेलबाद झाला आणि हैदराबादला पहिला झटका बसला. त्याने ४१ धावा केल्या. दीर्घ विश्रांतीनंतर संघात आलेला कर्णधार विल्यमसनदेखील लवकर माघारी परतला. त्याने केवळ ३ धावा केल्या. नवख्या रिकी भुईलाही चांगली कामगिरी करता आली नाही. १२ चेंडूत ७ धावा करून तो बाद झाला.

पण वॉर्नरने एक बाजू लावून धरली होती. ४ षटकात ५२ धावांची गरज असताना हैदराबादची धावसंख्या ३ बाद १०६ होती. पण त्यानंतर डेव्हिड वॉर्नर अर्धशतक करून माघारी गेला. फटकेबाजी गरजेची असल्याने त्या प्रयत्नात तो अर्धशतकानंतर लगेचच बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. वॉर्नरनंतरच्या चेंडूवर विजय शंकरही १ धाव काढून बाद झाला. तो बाद झाल्यावर पत्त्याचा बंगला कोसळावा तसा हैदराबादचा डाव कोसळला आणि हैदराबादचा डाव ११६ धावांमध्ये आटोपला. सलामीवीर वॉर्नर आणि बेअरस्टो वगळता कोणीही दोन अंकी धावसंख्या गाठली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.