भुसावळातून दुचाकी लांबवली : भादलीच्या चोरट्यास बेड्या

0

भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

भुसावळ (प्रतिनिधी)- रावेर तालुक्यातील खिर्डीच्या इसमाची भुसावळातील एचडीएफसी बँकेजवळील मान रेसीडेन्सी हॉटेलच्या आवारातून 25 ऑक्टोबर रोजी दुचाकी चोरीला गेली होती. बाजारपेठ पोलिसात याबाबत गुन्हा दाखल केल्यानंतर गोपनीय माहितीवरून बाजारपेठ पोलिसांनी भादलीच्या चोरट्यास बेड्या ठोकत दुचाकी जप्त केली आहे. विजय अशोक कोळी (25, रा.इंद्र नगर, भादली, ता.जि.जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

बँकेत जाताच लांबवली दुचाकी

खिर्डी, ता.रावेर येथील मुकेश दत्तात्रय पाटील (29) हे 25 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ शहरात आल्यानंतर त्यांनी दुचाकी (एम.एच.19 बी.एक्स.0885) हे मान रेसीडेन्सीच्या आवारात लावली होती व ते रात्री आठ वाजता परत आल्यानंतर त्यांना दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आले. शोध घेवूनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी 27 रोजी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल केला.

28 रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास वाल्मीक नगर भागात पोलिसांची गस्त सुरू असताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे, हवालदार वाल्मीक सोनवणे, कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत चव्हाण, प्रशांत परदेशी आदी पेट्रोलिंग करताना संशयीत आरोपी विजय कोळी हा विना क्रमांकाची दुचाकीवर येताना दिसल्याने त्याची खोलवर चौकशी केल्यानंतर त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.

जिल्हा पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल मोरे. हवालदार वाल्मीक सोनवणे, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, उमाकांत पाटील, प्रशांत चव्हाण, प्रशांत परदेशी आदींच्या पथकाने कार्यवाही केली.

Leave A Reply

Your email address will not be published.