“भाजपाची सूज लोकांनीच उतरवली” ; ग्रामपंचायत निकालावरून सेनेचा भाजपवर हल्लाबोल

0

मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल समोर आल्यानंतर अनेक ठिकाणी सत्तांतर झालं, तर काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. निवडणूक निकालानंतर सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा भाजपाने केला आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर लोक नाराज असून, जनतेची नाराजी निकालातून दिसल्याचं भाजपा नेत्यांकडून सांगण्यात आले. भाजपाच्या या दाव्यांना शिवसेनेने प्रत्युत्तर दिले आहे.

“ग्रामपंचायती हा लोकमताचा कौलच असतो, तो मान्य करा नाहीतर महाराष्ट्रातील जनता आणखी माती केल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा देत शिवसेनेनं भाजपाच्या आरोपांचा समाचार घेतला आहे.ग्रामपंचायत निवडणुकीचं शिवसेनेनं सामनाच्या अग्रलेखात विश्लेषण केलं आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत आघाडी सरकारनं बाजी मारल्याचा दावा करताना शिवसेनेने भाजपावर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडी सरकारला जनमताचा अजिबात पाठिंबा नाही. ‘ठाकरे सरकार’ म्हणजे जुगाड आहे, ते जोडतोडीतून बनले आहे अशी तोंडची हवा महाराष्ट्रातील विरोधी पक्ष गेले वर्षभर सोडत आहे. त्या विरोधी पक्षाची हवा ग्रामपंचायत निवडणुकीत निघाली आहे. राज्यभरातील साडेतीन हजारांवर ग्रामपंचायतींचे निकाल हाती येत आहेत. त्यात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी जिंकलेल्या ग्रामपंचायती पाहता भाजपाची सूज लोकांनी उतरवली आहे हे स्पष्ट दिसत आहे,” असे शिवसेनेने म्हटले आहे.

 

“राज्याच्या संपूर्ण निकालाची गोळाबेरीज पाहता भारतीय जनता पक्षाला लोकांनी झिडकारले आहे. याचा दुसरा अर्थ असा की, महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारला लोकांनी स्वीकारले आहे. विरोधकांनी गेले वर्षभर ज्या बदनामी मोहिमा राबवल्या, सरकारच्या विरोधात जहरी प्रचार केला, त्याचा काहीच परिणाम झाला नाही. दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचे आंदोलन हे मूठभर शेतकऱ्यांचे आंदोलन असल्याची तोंडपाटीलकी चंद्रकांत पाटील यांनी केली होती, पण दिल्लीतील शेतकऱ्यांचे आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचेही आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.