भाजपाकडून ३६ उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर

0

नवी दिल्ली – १७ व्या लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजपाने रात्री १.३५ वाजता ३६ उमेदवारांच्या नावांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीमध्ये आंध्र प्रदेश, आसाम, महाराष्ट्र आणि ओदिशामधील उमेदवारांचा समावेश आहे. त्यापैकी महाराष्ट्रातील सहा मतदारसंघातील उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली.

गेल्या काही दिवसांपासून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही मतदारसंघातील उमेदवारांबाबत निर्माण झालेला संभ्रम अखेर आज दूर झाला आहे. मध्यवर्ती निवडणूक समितीच्या रात्री उशिरापर्यंत चाललेल्या बैठकीनंतर भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 36 उमेदवारांचा समावेश असलेली आपली यादी प्रसिद्ध केली आहे. त्यापैकी महाराष्ट्रामधील त्यामध्ये जळगाव येथून स्मिता उदय वाघ, नांदेड येथून प्रताप पाटील चिखलीकर, दिंडोरी येथून डॉ. भारती पवार, पुण्यामधून गिरीश बापट, बारामती येथून कांचन राहुल कूल आणि सोलापूर येथून जयसिद्धेश्वर स्वामी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. मात्र ईशान्य मुंबईतील उमेदवार भाजपाने अद्यापही घोषित केलेला नाही. त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीबाबत संभ्रम वाढला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघातून पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी देण्यात आल्याने विद्यमान खासदार अनिल शिरोळे यांचा पत्ता कट झाला आहे. पुणे शहर लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीबाबत मोठी उत्सुकता होती. भारतीय जनता पक्षाच्या पहिल्या दोन यादीत विद्यमान खासदार शिरोळे यांचे नाव नसल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. दरम्यान गिरीश बापट यांनी गेल्या काही दिवसांपासून गाठीभेटी सुरू केल्या होत्या. शुक्रवारी भारतीय जनता पक्षाचे सहयोगी खासदार संजय काकडे यांचे बंड थंड झाले होते. कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार नाही असे त्यांनी जाहीर केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.