भाजपला बसणार धक्का ! खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली

0

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा रंगली होती. पण, अखेर आता एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत 22 ऑक्टोबर रोजी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे.  यावेळी खडसेंसोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचीही माहिती आहे. हा प्रवेश सोहळा  मुंबईतील प्रदेश कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी  दिली आहे.

 

विशेष म्हणजे, शरद पवार यांनी सोमवारीच एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबद्दल सूचक विधान केले होते. ‘एकनाथ खडसे विरोधीपक्ष नेते होते. राज्याचे अर्थमंत्री होते. एक नेता म्हणून खडसे यांचे मोठे योगदान आहे. ते आम्ही पाहिले आहे. आणि त्यामुळे त्याचं कर्तृत्व, जबाबदारी आम्ही पाहिले आहे. त्यामुळे राजकीय निर्णय काय घ्यायचा आहे, तो त्यांना पाहावा लागणार आहे, असं पवार म्हणाले होते. त्यामुळे राष्ट्रवादीकडून निर्णय झाला आहे, फक्त खडसेंच्या निर्णयाची औपचारिकता बाकी होती. अखेर त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे.

 

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून विधानपरिषदेवर पाठवली जाण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून लवकरच राज्यपालांकडे त्यांच्या नावाची शिफारस केली जाईल, अशी चर्चा आहे. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणखी बळकट होईल. तसेच एकनाथ खडसे यांच्यासारख्या बड्या नेत्याला महाविकासआघाडी सरकारमध्ये काय जबाबदारी द्यायची, यावरही खल सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांना कृषीमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.