भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास ; खडसेंचा आरोप

0

जळगाव : कोरोना संसर्गाच्या काळात भाजप नेत्यांकडून जे राजकारण केले जात आहे त्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी सडकून टीका केली आहे. त्याचवेळी गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतही खडसे यांनी मोठे विधान केले.

भाजपच्या काही नेत्यांकडून ओबीसी नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. गोपीनाथ मुंडे यांचा अशाच पद्धतीने छळ झाला. गोपीनाथ मुंडे यांच्याइतका छळ महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्याचा झाला नाही, असे विधानही खडसे यांनी यावेळी केले.  त्यांचा जेवढा छळ झाला तेवढा महाराष्ट्रातील अन्य कोणत्या नेत्याचा झाला नाही. माझ्यावर झालेल्या अन्यायासंदर्भात मी विधानसभेत भूमिका मांडली. परंतु, काही एक उपयोग झाला नाही. माझ्याप्रमाणे चंद्रशेखर बावनकुळे, अण्णा डांगे, भाऊसाहेब फुंडकर या नेत्यांचाही छळ झाला. आता तर चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकी देणे हे तर भलतंच झालं. यावरून माझ्यामागे ईडी लावण्याचे षडयंत्र यांचेच असल्याचे स्पष्ट झाले आहे, असा आरोपही खडसेंनी केला. एकनाथ खडसे सोमवारी दुपारी जळगावात आले होते.

दरम्यान, एकनाथ खडसे यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी करोनाच्या लढ्याबाबत मांडलेल्या भूमिकेचे स्वागत केले.  करोनाच्या लढ्याबाबत भाजप नेते नितीन गडकरी यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे. हीच भूमिका महिनाभरापूर्वी मीदेखील मांडली होती. करोनाचे संकट दूर करायचे असेल तर सर्वांनी मतभेद विसरून एकत्र यायला हवे. आम्ही विरोधक आहोत की सत्ताधारी हे विसरून करोना कसा दूर करता येईल, यासाठी विधायक सूचना देणे, प्रत्यक्ष कृतीद्वारे काम करणे गरजेचे आहे. यंत्रणेवर दररोज टीका करणे, त्रुटी काढणे असे प्रकार केल्यामुळे यंत्रणा नाउमेद होते. त्यामुळे असे प्रकार टाळायला हवे, असेही खडसेंनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.