भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांचा राजीनामा

0

अमळनेर  :- लोकसभा निवडणुकीत अमळनेर येथील प्रचारसभेत जलसंपदामंत्र्यांसमोर झालेल्या हाणामारीनंतर राज्यभरात चर्चेत आलेले भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. दरम्यान, वाघ यांनी राजीनामा दिल्यानंतर नवीन नावाची चर्चा सुरू झाली आहे. त्यात भडगावचे डॉ.संजीव पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

लोकसभा निवडणुकीत आमदार स्मिता वाघ यांना लोकसभेची उमेदवारी जाहिर करण्यात आली होती. त्यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला होता. परंतु ऐनवेळी पक्षाने त्यांची उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना उमेदवारी जाहिर केली. याच वेळी अमळनेरचे माजी आमदार डॉ.बी.एस.पाटील यांनी एका जाहिर सभेत उदय वाघ यांच्या विरूध्द जाहिर टिका केली होती. त्यावरून अमळनेर येथे पक्षातर्फे लोकसभा उमेदवार उन्मेश पाटील यांच्या प्रचाराच्या सभेत उदय वाघ यांनी माजी आमदार बी.एस.पाटील यांना व्यासपीठावर माराहाण केली होती. यावेळी जलसंपदामंत्री व पक्षाचे नेते गिरीश महाजनही उपस्थित होते.  या प्रकारानंतर जिल्हाध्यक्षांवर काय कारवाई होणार याबाबत पक्षात चर्चा सुरू असताना जिल्हाध्यक्ष वाघ यांनी प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी दोन दिवस आधीच वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्षांना दिले. शनिवारी प्रदेशच्या बैठकीत जळगावच्या जिल्हाध्यक्षपदाचा तिढा सुटणार आहे.  दरम्यान, रिक्तपदावर भडगाव येथील भाजपचे पदाधिकारी डॉ. सजीव पाटील यांची नियुक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.