बोदवड येथे सामाजीक वनीकरण विभागाकडून ‘चेंडू फेक’ प्रकारानंतर आता कालावधी निघून गेल्याचा कांगावा

0

बोदवड (सुनिल बोदडे) : तालुक्यात महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून व सामाजिक वनीकरण विभागा मार्फत राबवण्यात येणाऱ्या रोडच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची कामे सुरु न करता सामाजिक वनीकरण विभागाकडून गेल्या एक महिन्यापासून ‘चेंडू – फेक’ प्रकार सुरु असल्याचे बोलले जात असून ‘नाचता येईना अंगण वाकडे’ म्हणी प्रमाणे वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत वेळ मारून नेण्याचा प्रकार केला जात असल्याची चर्चा तालुक्यात आहे.

तालुक्यात रोजगार हमी योजनेतून सामाजिक वनीकरण विभागामार्फत रोडच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचे ४९ कामे मंजूर आहेत.त्यातील ९ ते १० कामे ऑनलाईन करण्यात आली असून ही कामे गेल्या एक महिन्यांपासून सुरु होण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

किमान लॉकडाउन काळात ही कामे सुरु झाल्यास ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार उपलब्ध होऊन शासनाचे वृक्षलागवड त्याचे संवर्धन व मजुरांना रोजगार असा तिहेरी उद्देश या निमित्ताने पूर्ण होणार अशी आशा होती.मात्र बोदवड येथे सामाजिक वनीकरण विभागाच्या ‘चेंडू – फेक’प्रकारामुळे सदरची कामे आज रोजी बंद अवस्थेत आहेत.

विभागीय वन अधिकारी,सामाजीक वनीकरण विभाग जळगाव यांनी दि.२१ ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रशासकीय मान्यता व कार्यारंभ आदेशात सदरची कामे प्रचलित कार्यपद्धतीच्या अधीन राहून तात्काळ सुरू करावीत असे आदेशीत केले असतानाही याकडे संबंधितांनी दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे.

बोदवड येथील सामाजिक वनीकरण कार्यालयात कायमस्वरूपी वनपरिक्षेत्र अधिकारी नसल्याने विभागीय वन अधिकारी यांनी सदरची कामे तात्काळ व उचित कालावधीत सुरू व्हावीत म्हणून प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी यांची नियुक्ती केली असतांनाही सदरची कामे त्यांनी सुरु न करण्याचे कारण गुलदस्त्यात आहे.विशेष म्हणजे सदरची कामे ऑनलाईन असताना तालुक्यात पाच ते सहा वेळा पावसाने जोरदार हजेरी लावली होती.म्हणजेच सदरची ही कामे सुरू झाली असती तर आज रोजी सामाजिक वनीकरण विभागाचा वृक्षलागवडीचा उद्देश साध्य झाला असता.

तालुक्यात सामाजिक वनीकरण विभागाकडून करण्यात आलेल्या विविध कामांबाबत तक्रारी असून सदर कामांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी सुरू असल्याचे बोलले जात आहे.मात्र चौकशीअंती सत्य काय ते समोर येईलचं मात्र तक्रारीचा बहाणा पुढे करत कामे सुरू न करणे कितपत योग्य आहे?असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

विशेष:म्हणजे विभागीय वन अधिकारी,सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी पुनश्च सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर कामे दि.२० सप्टेंबर २०२० पूर्वी ऑनलाईन करून हजेरी पत्रके काढावे असे पत्राव्दारे आदेशित केले होते.मात्र याकडेही संबंधितांनी दुर्लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे.

एकंदर गेल्या एक महिन्यापासून सामाजिक वनीकरण विभागाकडून सदर कामे सुरू करण्याच्या नावाखाली वेळकाढूपणा केला जात असून आज रोजी कालावधी निघून गेल्याचा सांगीतले जात आहे.त्यामुळे वरिष्ठांच्या आदेशाचे पालन न केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का?असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.