बीएचआर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी भाजपचे आ. चंदुलाल पटेल यांच्यावर गुन्हा दाखल

0

जळगाव (प्रतिनिधी)

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात अटक वॉरंट निघाल्यापासून जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल हे मुख्य सूत्रधार सुनील झंवरप्रमाणे अंडरग्राऊंड झाले आहेत. दरम्यान, ११ जणांना अटक झाली, त्यादिवशी पटेल थोडक्यात इंदूरमधून पोलीसांचे पथक येण्याआधीच तेथून पसार होण्यात यशस्वी झाले होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. दुसरीकडे राज्याच्या विविध भागात आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पटेल यांचा कसून शोध घेत आहेत.

बीएचआर घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेच्या भाग्यश्री नवटके यांनी मागील वर्षापासून अनेक बड्या लोकांना बेड्या घातल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वी तर एकाच दिवशी राज्यातील विविध शहरातून ११ लोकांना अटक केली होती. तेव्हापासूनच आ. चंदुलाल पटेल हे अचानक जळगावातून बेपत्ता झाले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तबल १५ जणांचे अटक वॉरंट घेऊन जळगावात आले होते. त्यात आमदार पटेल यांचाही समावेश होता. पण, ऐनवेळी ते जळगावातून पसार होत इंदूरला पोहचले. पोलिसांनी पटेल यांच्या मोबाईलचे लोकेशन काढल्यानंतर पटेल हे इंदूर येथे असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांचे पथक त्याही ठिकाणी पोहचले होते. मात्र तेथूनही पटेल कारने पसार होण्यात यशस्वी झाले होते.

आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तेव्हापासून पटेल यांच्या मागावर आहे. काही जणांच्या मते आ. पटेल अधिवेशनाच्या काळात मुंबईत होते. तर काहींच्या मते अटकेची माहिती मिळाली तेव्हापासूनच दुबईला निघून गेले आहेत. आ. पटेल यांनी साधारण २ कोटीचे कर्ज ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग करून भरल्याचे कळते. तसेच आ. पटेल यांचे कर्ज ३० टक्के पावत्या मॅचिंग करून देण्यासाठी अवसायक जितेंद्र कंडारेवर कुणी राजकीय दबाव आणला होता का?, याची देखील पोलीस चौकशी करणार असल्याचे कळते. आ. पटेल यांना अटक झाल्यास बीएचआर घोटाळ्यात आणखी काही मोठी नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवसायक जितेंद्र कंडारेला जळगावमधील बीएचआरच्या मुख्य शाखेत आणत चौकशी केली होती. साधारण २५०० फाईल्स मधून पोलिसांनी पुराव्याच्यादृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या २५ फाईली सोबत नेल्या आहेत. या फाईलमधून आ. पटेल यांच्याप्रमाणे ३० टक्क्यात पावत्या मॅचिंग करून देणाऱ्यांची कुंडली समोर येण्याची शक्यत वर्तवली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.