बाळद रस्ता विकसित करण्यासाठी जि.प.ची नारहरकत प्राप्त !

0

नगरसेवक अमोल पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

भडगाव (प्रतिनिधी) :  भडगाव नगर परिषदेच्या प्रभाग क्र. ४ च्या हद्दीतून जाणाऱ्या भडगाव -बाळद ग्रामीण मार्ग चाळीसगाव रोड ते पाटचारी १.५०० कि.मी. पर्यंत रस्ता विकसित करणे कामी जळगाव जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी भडगाव नगरपरिषदेला नाहरकत प्रमाणपत्र दिले.

सदर रस्ता नगरपरिषद हद्दीत असूनही जिल्हा परिषदेच्या मालकीचा असल्याने विकसित करणेसाठी नगरपरिषदेला तांत्रिक अडचणी येत होत्या. रस्त्याच्या दुतर्फा जवळपास एक हजार घरांची नवीन वस्ती असून दिवसभरात दोन ते तीन हजार नागरिकांची ये -जा आहे. नागरिकांना पायी अथवा वाहनांने वापर करतांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. यापूर्वीही नगरपरिषद हद्दीतील बाळद रस्ता न.पा. कडे हस्तांतरण करण्यासाठी दि. १४ / ०२ / २०१७च्या  सर्वसाधारण सभेत ठराव  झाला. ठराव्याच्या अनुषंगाने नगरसेवक अमोल पाटील यांनी मुख्याधिकारी यांचेकडे केलेल्या मागणीनुसार जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. परंतु हस्तांतरणाची प्रक्रिया अंत्यत वेळखाऊ असल्याने दि. ०९ / ०८ / २०१९ रोजीच्या विशेष सर्वसाधारण सभेत जि.प. कडून नाहरकत मिळणे कामी ठराव करुन प्रस्ताव पाठविण्यात आला.

बाळद रस्ता पाटचारीपर्यंत डांबरीकरण करणेसाठी दि. ०७ / ०६ / २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर करण्यात आला आहे. रस्त्याच्या कामासाठी ” नविन स्थापन नगरपरिषदांना विशेष अर्थसहाय्य योजना किंवा विशेष रस्ता अनुदान योजनेतून रु. ४.४४ कोटी निधी मिळणे कामी जून महिन्यात महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. सदर रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध होणे कामी नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री तथा जळगावचे पालकमंत्री ना. गिरीषभाऊ महाजन यांना विनंती केली होती. त्यानुसार आ. गिरीषभाऊ महाजन यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचेकडे अनुदान मंजूर करणेबाबत लिखित शिफारस केली होती.

जि.प. च्या ना हरकत प्रमाणपत्रामुळे निधी मिळणेसाठीची तांत्रिक अडचण दूर झाली असून नगर परिषदेने कामाचे अंदाजपत्रकही तयार केले आहे.  सदर कामासाठी नगरसेवक अमोल नाना पाटील यांनी पाठपुरावा केला असून नगराध्यक्ष अतुल पाटील, सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी विकास नवाळे ,  जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, कार्यकारी अभियंता व उपविभागीय अभियंता, बांधकाम विभाग, जि.प. जळगाव , नगर अभियंता रणजित पाटील, न.पा. कर्मचारी नितीन पाटील, कमलाकर देशमुख यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.