बलात्काऱ्यांना १०० दिवसांत फाशी ; मुख्यमंत्री ठाकरेंनी मागवला अहवाल

0

मुंबई : आंध्र प्रदेश विधानसभेत बलात्काऱ्यांना २१ दिवसात फाशीची तरतूद असणारं ‘दिशा विधेयक २०१९’ मंजूर करण्यात आलं आहे. अशातच आता महाराष्ट्रातही बलात्काराच्या आरोपींना १०० दिवसांत फाशी दिली जावी असा प्रस्ताव शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मांडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रस्तावाची दखल घेत याप्रकरणी मुख्य सचिवांकडून अहवाल मागवला आहे, असेही सरनाईक यांनी सांगितले.

देशातील अनेक भागात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने देशभर संतापाचे वातावरण आहे. आंध्र प्रदेशात बलात्कासारख्या गंभीर गुन्ह्यात कठोर शिक्षा देण्याची तरतूद असून २१ दिवसात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे. हा कठोर कायदा प्रत्येक राज्यात लागू झाला पाहिजे. मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री एकनाथ शिंदे यांना हा कडक कायदा अंमलात आणावा अशी मागणी केली आहे. दरम्यान , मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशने जो कायदा केला आहे, तो राज्यात कशाप्रकारे लागू होऊ शकते यासंबंधी अहवाल आणि मसुदा मागवला आहे असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे.

सध्या विधीमंडळाचं अधिवेशन सुरु आहे. जलद कामगिरी केली तर या अधिवेशनातही विधेयक संमत केलं जाऊ शकतं असं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. विधेयकाला मंजुरी दिली तर महाराष्ट्र हे दुसरं राज्य ठरेल असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.