प्रसिद्ध उद्योगपती, अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्रा यांना अटक; काय आहेत कारणे ?

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या पोलीसांच्या गुन्हे शाखेनं त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, त्यानंतर राज कुंद्रा यांच्या अटकेची माहिती समोर येत आहे. पॉर्न फिल्म्स निर्मितीप्रकरणी प्रकरणात राज कुंद्रा यांचं नाव समोर आलं होतं. सोमवार दि १९ जुलै २०२१ ला दिवसभर त्यांची चौकशी झाली. त्यानंतर त्यांना गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

एका अभिनेत्रीलाही पोलिसांनी अटक केली होती. चित्रपट बनवणाऱ्या अनेक लोकांची चौकशी करण्यात आली होती. आज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलं. सुमारे 7 ते 8 तास चौकशी झाल्यानंतर संध्याकाळी अटक करण्यात आली आहे. उद्या त्यांना न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे. राज कुंद्रा विरोधात पुरेसे पुरावे असल्यामुळे राज कुंद्रा यांना अटक झाल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे.

राज कुंद्रा यांच्या विरोधात यापूर्वीही तक्रार

– राज कुंद्रा यांचे नाव याआधी आयपीएलच्या सट्टेबाजी प्रकरणातही समोर आले होते. त्यांना हयात असेपर्यंत क्रिकेटपासून दूर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले. तर राजस्थान रॉयल्सचे ते सहमालक होते मात्र या संघावरही दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.

– २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्यात इक्बाल मिर्ची कनेक्शन प्रकरणात राज कुंद्रा यांना ईडीने समन्स बजावलं होतं. राज कुंद्रा यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध असल्याचा संशय ईडीने व्यक्त केला होता.

– बिटकॉईन घोटाळ्यात राज कुंद्रांना ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने २०१८ साली समन्स बजावले होते. २ हजार कोटींचा हा बिटकॉईन घोटाळा असण्याचं सांगण्यात आलेलं. समन्स जारी केल्यानंतर ५ जून २०१८ रोजी राज कुंद्रांनी इडीचे कार्यालय गाठले होते.

– २०१७ मध्येही घोटाळ्यासंदर्भात राज कुंद्रांचे नाव चर्चेत आले होते. कारण ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून एका व्यापाऱ्याला लाखो रुपयांना गंडा घातल्या प्रकरणात त्यांचे आणि शिल्पा शेट्टीचे नाव चर्चेत आले होते.

– शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध एका उद्योगपतीने मार्च 2020 मध्ये तक्रार केली होती. मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी पोलिसात तक्रारीत केली होती. हे प्रकरण सोन्याचा व्यापार करणारी कंपनी ‘सतयुग गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड’शी (एसजीपीएल) संबंधित होतं. कुंद्रा हे यापूर्वी या कंपनीचे माजी संचालक होते. मुंबईतील खार पोलीस स्टेशनमध्ये जोशी यांनी शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा, गणपती चौधरी, मोहम्मद सैफीसह एसजीपीएलच्या इतर अधिकाऱ्यांवर फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती.

–  उद्योगपती सचिन जोशी आणि राज कुंद्रा-शिल्पा शेट्टी यांच्यात 2014 रोजी देवाण-घेवाणीवरुन वाद झाला होता. 15 दिवसांपूर्वी जोशी यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे, अशी माहिती समोर येत आहे. “मला लालच देऊन माझी फसवणूक केली आहे. 2014 रोजी सुरु करण्यात आलेल्या एसजीपीएलची सतयुग गोल्ड स्कीमद्वारे फसवणूक केली आहे”, असा आरोप मुंबईतील एक नॉन-रेसिडेन्शिअल इंडियन उद्योगपती सचिन जे. जोशी यांनी केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.