प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देवू, फक्त संसद सुरळीत चालू द्या; मोदींचे विरोधकांना आवाहन

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अधिवेशन सुरू होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी सरकार प्रत्येक विषयावर चर्चा करण्यास तयार आहे, सरकार प्रत्येक प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे. फक्त संसद सुरळीत चालू द्या, असे आवाहान विरोधकांना केले.

मोदी म्हणाले, ‘संसदेचे हे अधिवेशन खूप महत्त्वाचे आहे. संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात देशाच्या प्रगतीची चर्चा व्हावी, असे देशातील प्रत्येक नागरिकाला वाटते. देशाच्या हितासाठी आणि विकासासाठी संसदेत चर्चा व्हायला हवी. भारताच्या संसदेने या अधिवेशनात आणि येणाऱ्या सर्व अधिवेशनांमध्ये स्वातंत्र्यप्रेमींच्या भावनांनुसार देशहिताची चर्चा व्हावी, अशी देशाची इच्छा आहे.’

‘भविष्यात संसद कशी चालवायची, तुम्ही किती चांगले योगदान दिले, किती सकारात्मक काम केले, या तराजूत तोलायला हवा. अधिवेशन कोणी बंद पाडले, हा निकष नसावा. सरकारच्या विरोधात, धोरणांच्या विरोधात आवाज बुलंद व्हायला हवा, पण संसदेची प्रतिष्ठा, अध्यक्षांची प्रतिष्ठा, खुर्चीचा मान राखून आपण आचरण केले पाहिजे, असेही मोदी म्हणाले.

संसदेचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार असून ते 23 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. या दरम्यान एकूण 19 कामकाजाचे दिवस असतील. सुमारे 30 विधेयके संसदेत मांडली जातील, त्यात कृषीविषयक कायदे मागे घेण्याशी संबंधित विधेयकाचा समावेश आहे. कृषी कायदे निरसन विधेयक-2021 लोकसभेत विचारार्थ आणि पास होण्यासाठी सूचीबद्ध केले गेले आहे. लोकसभेत विधेयक मंजूर झाल्यानंतर ते संसदेच्या वरिष्ठ सभागृहात आणले जाईल. पण, हिवाळी अधिवेशनात विरोधकांचा गदारोळ सुरू राहण्याची शक्यता आहे.

हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी सरकारने रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित नव्हते. संरक्षण मंत्री आणि लोकसभेचे उपनेते राजनाथ सिंह यांनी अर्थपूर्ण कामकाज आणि सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी सर्व पक्षांचे सहकार्य मागितले. लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेच्या अध्यक्षांच्या परवानगीने नियमांनुसार सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास सरकार तयार आहे, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बैठकीत सरकारच्या वतीने सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.