पुण्यातील अपहृत युवकाची जळगावात सुटका

0

जळगाव । तीन लाख रुपयांसाठी ३० वर्षीय तरुणाने पुण्यातून अपहरण करून जळगावातील एका हॉटेलमध्ये आणले होते. याची माहिती पोलिसांना मिळताच शहर पोलीसांनी याठिकाणी धाव घेवून अपहृत युवकाची सुटका करीत अपहरण करणार्‍या दोघांना ताब्यात घेतले.

पुणे येथील यज्ञेश विनोदभाई तिलवा (वय 30) याने कंपनी तयार करून अनेकांकडून पैसे जमा केले. त्यानुषंगाने दिलीप जगन अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी या कंपनीत पैसे अडकविले होते. या पैश्याच्या मागणीसाठी दोघांनी यज्ञेशकडे पैश्यासाठी तगादा लावत होते. पैश्यासाठी यज्ञेश याला वारंवार फोन करूनही तो उचलत नव्हता. त्यामुळे दि.13 रोजी दुपारी दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांनी एमएच 12 एनबी 0749 क्रमांकाच्या कारमध्ये यज्ञेश याला बळजबरी बसवून त्याचे अपहरण केले होते. याबाबत यज्ञेश याची पत्नी स्वाती तिलवा यांच्या फिर्यादीवरून दि.13 रोजी पिंप्री चिंचवड पोलीसात दिलीप अवसरमल व गणेश मोळे या दोघांविरुध्द अपहरण व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोघांनी अपहृत यज्ञेश याला पुण्याहून कारने चाळीसगाव येथे आणले. त्यानंतर यज्ञेश व दोघांना समझोता झाला. त्यानंतर यज्ञेश याला घेवून दोघे मंगळवारी सकाळी जळगावात आले. यज्ञेश याला घेवून दोघे रेल्वेस्टेशन परिसरातील हॉटेल अमरप्रेम येथे थांबलेले असतांना त्यांनी पुन्हा चाळीसगाव येथून तीच कार जळगावी बोलविली. मंगळवारी सायंकाळी कारचालकासह अन्य एक जण व अपहृत यज्ञेश तिलवा, दिलीप अवसरमल व गणेश मोळे हे पाचही जण जळगाव येथून पुन्हा पुणे येथे जाणार होते. दरम्यान अपहरण करून त्याला जळगावात आणल्याची माहिती पिंप्री चिंचवड आयुक्तांनी जळगाव पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्याशी संपर्क करून घटनेबाबत कळविले. त्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. उगले यांनी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापु रोहम यांना संशयितांचा शोध घेण्याबाबत सुचना केल्या. दरम्यान संशयित रेल्वेस्टेशन परिसरात असल्याची माहिती शहर पोलीसांना मिळाली.यात अपहृत यज्ञेशची सुटका करण्यात आली असून पोलीसांनी कारचालकासह अन्य एकाला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.