पाचोऱ्यात वाळू माफियांची वाढली मुजोरी ; पती समोर केला महिलेचा विनयभंग

0

पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोरा शहरात वाळू माफियांची दिवसेंदिवस मुजोरी वाढतच असून उपविभागीय अधिकाऱ्यांच्या व पाचोरा शहराच्या तलाठ्या़च्या घरावर दगडफेकी नंतर आता थेट रस्त्यावर शतपावली करणाऱ्या महिलांची छेड करून पतीसोबत मारहाण करण्यापर्यंत मजल गेली आहे.

पाचोरा शहरातील जिजामाता कॉलनीत रात्री जेवणानंतर पायी फिरणाच्या शिंदे दांपत्यास अडवून एका वाळु माफियाने पतीसमोरच पतीच्या छातीत मारहाण करुन त्यास विचारणा करणाऱ्या पतीसही मारहाण करत जीवे मारण्याची धमकी देऊन उजवा हात फॅक्चर केल्याची घटना शनिवारी रात्री ९.३० वाजेच्या दरम्यान घडल्याने एकावर विनयभंग व जीवे ठार मारण्याच्या धमकीचा गुन्हा दाखल केला आहे. पाचोरा पोलीसांनी संशयित आरोपीस तातडीने ताब्यात घेतल्यानंतर चौकाचौकात नेवून चांगलीच धुलाई केल्याने गुंड प्रवृत्तीच्या नागरीकांना चांगलाच चपराक बसला आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार ज्ञानेश्वर पाटील हे करीत आहेत.

पाचोरा शहरातील जिजामाता कॉलनीतील रहिवासी असलेले अजिंक्य सुरेश शिंदे व त्यांची २४ वर्षाची पत्नी दिनांक १२ रोजी रात्री ९.३० वाजता जेवण झाल्यावर लिलावती हॉस्पिटल समोरील रस्त्याने फिरत असतांना समोरुन वाळूचा व्यवसाय करणारा भैय्या संजय पडोळ रा. पुनगाव रोड हा युवक मोटार सायकलवरून येवून अजिंक्य शिंदे यांच्या पत्नीस शिवराळ भाषेत शिविगाळ करत छातीवर मारहाण केली. याबाबत शिंदे यांनी विचारणा केली असता त्यांना ही मारहाण करुन त्यांचा उजवा हात फॅक्चर केला व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. संशयित आरोपी भैय्या संजय पडोळ यास पोलिसांनी तातडीने त्याचे राहते घरुन ताब्यात घेतले व रविवारी सकाळी अकरा वाजता घटनास्थळा जवळील चौकात नेवून पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, राहुल सोनवणे, किरण पाटील, किशोर पाटील, दिपक सुरवाडे यांनी चांगलीच धुलाई केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी जमा झाली होती. भैय्या पडोळ यांचेवर यापूर्वी तलाठी आर. डी. पाटील यांचे घरावर दगडफेक करणे सह अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.

पाचोरा शहरातील चौकाचौकात रात्रभर दारुच्या नशेत तर्र होऊन वाळूचे भरधाव वेगाने ट्रॅक्टर चालविणे, आडव्या तेवड्या मोटारसायकली चारविणे असे प्रकार सर्रासपणे सुरू असल्याने महिलांमधे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. पाचोरा पोलिस ठाण्यात नव्यानेच रुजू झालेल्या पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांनी अनेक पोलिस ठाण्यात त्यांचा हिसका दाखवू गुंड प्रवृत्तीच्या लोकांना चांगलेच वठणीवर आणल्याचा इतिहास अनेकांना ज्ञात आहे. पाचोरा शहरातील त्यांनी त्याची पुनरावृत्ती करावी अशी सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.