पंतप्रधानांनी लस घेतल्याने जनतेचादेखील आत्मविश्वास वाढेल ; संजय राऊत

0

नवी दिल्ली : देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून याची सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी पहाटे एम्स रुग्णालयात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. मोदींनी ट्विटरला फोटो शेअर करत पात्र असणाऱ्या नागरिकांना देशाला करोनामुक्त करण्याचं आवाहन केलं. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लस घेतल्यावरुन कौतुक करताना टोलाही लगावला आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कृतीकडे राजकारण म्हणून नव्हे तर राष्ट्रीय एकात्मता म्हणून पाहायला हवे, अशी टिप्पणी त्यांनी केली. राष्ट्रीय एकात्मता हा काही एकट्या काँग्रेसचा मक्ता नाही. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या अवतीभोवती असतील याची काळजी घेत. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सळमार्गी नेते आहेत, असे संजय राऊत यांनी म्हटले.

 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गळ्यात आसामी पद्धतीचा गमचा घातला होता. हा गमचा म्हणजे आसाममधील महिलांच्या आशीर्वादाचे प्रतिक मानला जातो. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ज्या नर्सेसकडून कोरोना लस टोचण्यात आली त्यांचीही बरीच चर्चा सुरु आहे. यापैकी पी. निवेदा या पुदुचेरीच्या आहेत. तर दुसरी नर्स ही केरळमधील होती. या नर्सेसनी मोदींना लस टोचून काहीवेळ त्यांच्यावर देखरेख ठेवली.

 

केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. यामध्ये आसाम, पुदुचेरी आणि केरळचा समावेश आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पेहराव आणि इतर ‘योगायोग’ प्रतिकात्मक राजकारणाचा भाग असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारुन चालणार नाही.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाची लस टोचून घेतल्यामुळे आता जनतेत विश्वास निर्माण होईल. या लसीमुळे आपले रक्षण होईल, हा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल. पंतप्रधानांची ही कृती कौतुकास्पद असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.

Leave A Reply

Your email address will not be published.