नुकसानग्रस्तांना शासनाकडून मदत जाहीर; सर्वाधिक भरपाई जळगाव जिल्ह्याला

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदाच्या मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वृष्टीमुळे बाधीत झालेल्या शेतकर्‍यांसाठी राज्य सरकारने मदत जाहीर केली असून यात सर्वाधीक ३५ कोटी ३५ लाख रूपयांची मदत ही जळगाव जिल्ह्यास जाहीर करण्यात आली आहे. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता.

यंदाच्या मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा फटका पडला होता. यामुळे पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामुळे आपत्तीग्रस्त शेतकर्‍यांसाठी राज्य मंत्रीमंडळाच्या १२ मे २०२१ रोजी झालेल्या बैठकीत मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. राज्यातील कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर येथील विभागीय आयुक्तांकडून १२२ कोटी २६ लाख ३० हजार रूपयांच्या नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता.

या अनुषंगाने आज राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीने या मदतीच्या रकमेला मंजुरी दिली आहे. यात राज्यात सर्वात जास्त म्हणजे ३५ कोटी ३५ लाख ३१ हजार इतकी रक्कम ही जळगाव जिल्ह्यास मिळणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. जळगाव जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदा निसर्गाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत शेतकर्‍यांना मदत देण्याबाबतचा प्रश्‍न उपस्थित केला होता. याची दखल घेऊन जिल्ह्यास भरीव मदत जाहीर करण्यात आलेली असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

दरम्यान, आजच्या शासन निर्णयानुसार पीक आणि फळबागांचे ३३ टक्के जास्त नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना या मदतीचा लाभ होणार आहे. या संदर्भात तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहायकांची संयुक्त स्वाक्षरी असणारे पंचनामे ग्राह्य धरून संबंधीत शेतकर्‍यांना ही मदत त्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनाकडून थेट जमा करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.