नाथाभाऊ पदासाठी पक्ष बदलणाऱ्यापैकी नाही’ – खडसेंची भाजपवर टीका

0

मुंबई । “कोणी काही पद देणार म्हणून नाथाभाऊ राष्ट्रवादीत प्रवेश करत नाही,” असा खोचक टोला भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला. “माझ्या मतदारसंघातील विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी,” असेही एकनाथ खडसे म्हणाले. आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे या पार्श्ववभूमीवर ते माध्यमांशी बोलत होते.

“कोणी काही पद देणार आहे म्हणून नाथाभाऊ पक्ष प्रवेश करत नाहीत. माझ्या मतदारसंघात मी मंजूर केलेले काही विकास काम मोठ्या प्रमाणात पेडींग आहे. प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात फार मोठी विकासकाम अशीच आहेत.

या विकास कामांना वेग यावा यासाठी सरकारची मला साथ हवी आहे. त्यामुळे सरकारसोबत राहून मी आता ही काम करणार आहेत. यासाठी आजचा हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षप्रवेशापूर्वी दिली.

मागील ४० वर्षांपासून राजकारणात सक्रीय असलेले भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे आज (शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीररित्या प्रवेश करणार आहे.

आज दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीच्या कार्यालयात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंचा पक्षप्रवेश होणार आहे. एकनाथ खडसे हे राष्ट्रवादी प्रवेशासाठी काल दुपारी विशेष चार्टर्ड हेलिकॉप्टरने सहकुटुंब मुंबईला दाखल झाले. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि कन्या रोहिणी खडसेही आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.