नवीन वर्षात ओमायक्रॉनचे आव्हान !

0

2021 साल सरले. गेल्या 2021 या वर्षात भारतात कोरोना महामारीच्या दोन लाटा येऊन गेल्या. या कालावधीमध्ये कडक लॉकडाऊन लादण्यात आले. सर्वसामान्य नागरिक, ज्यांचे हातावर पोट असणारे, कामगार आदिंचे प्रचंड हाल  झाले. जळगाव जिल्ह्यात 31 डिसेंर 2021 पर्यंत 1 लाख 42 हजार 826 जणांना कोरोनाची लागण झाली. पैकी 1 लाख 40 हजार 229 रूग्णांची कोरोनातून मुक्त झाले. कोरोनातून बरे होण्याची ही टक्केवारी 98.18 इतकी येते. 2 हजार 579 इतक्या जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे मार्च 20 ते 31 डिसेंबर 21 या कालावधीतील कोरोनाच्या दोन लाटांचे जिल्हा प्रशासनाने आव्हान पेलले. काही असुविधा झाल्या, तक्रारी आल्या रूग्णांची तसेच त्यांच्या नातेवाईकांची गैरसोय झाली.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत लोकांच्या मनात जबरदस्त भिती होती ती भीती दुसऱ्या लाटेत राहिली नाही. तथापि दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनच्या तुटवड्याने हाहाकार माजला. परंतु कोरोना रूग्णांच्या उपचारासंदर्भात प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने चांगले कार्य केले. त्यांना जनतेचेही सहकार्य मिळाले. दुसरी लाट संपत असतांनाच गेल्या 3-4 महिन्यांपासून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू होती. डिसेंबर 21 च्या शेवटी तिसरी लाट म्हणजे ओमायक्रॉन या कोरोनाच्या भयानक व्हायरसचे भारतात विशेषत: दिल्ली आणि मुंबईमध्ये आगमन झाले. महाराष्ट्रात मुंबई,पुणे, नागपूर आणि आता नाशकातही ओमायक्रॉनचा पहिला रूग्ण आढळून आला. ही धोक्याची घंटा म्हणता येईल.

महाराष्ट्र शासनाने ओमायक्रॉनच्या प्रसाराचा धोका ओळखून आजपासूनच कठोर निर्णय लागू केले आहेत. लग्न सोहळ्यात आता 50 जणांचीच उपस्थिती राहील. इतर सार्वजनिक सोहोळ्यावरही बंधने लादण्यात आली आहेत. प्रतिबंधात्मक उपायांची अंमलबजावणी जे करणार नाहीत त्यांचेवर कारवाई होणार आहे. मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाड्या तसेच बाहेरगावाहून मुंबईला येणाऱ्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. आधीच महाराष्ट्रात एसटीच्या संपामुळे प्रवाशांचे हाल होत असतांना मुंबईच्या रेल्वेगाड्या रद्द झाल्याने प्रवाशांच्या नशिबी दुष्काळात तेरावा महिना म्हणावा लागेल.

2022 च्या नव्या वर्षात ओमायक्रॉन या कोरोना व्हायरसचे आव्हान पुन्हा भारतापुढे महाराष्ट्रापुढे निर्माण झाले आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र शासन सज्ज झाले आहे. यापूर्वीच्या कोरोनाच्या दोन लाटांचा मुकाबला करण्यात महाराष्ट्र शासन देशात अग्रेसर राहिले आहे. खुद्द सुप्रिम कोर्टाकडून महाराष्ट्र शासनाचे विशेषतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोरोनासंदर्भातील एवढी सखोल माहिती पाहून खुद्द या क्षेत्रातील नामवंत डॉक्टरसुध्दा आवाक होतात. त्यामुळे कोरोनाच्या  प्रतिबंधासंदर्भात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आरोग्य यंत्रणेकडून फसविले जाणे शक्य नाही. त्यामुळे ओमायक्रॉनच्या प्रतिबंधासाठी महाराष्ट्र सरकार सतर्क आहे.

शासन प्रशासनवर केवळ अवलंबून राहू नये जनतेनेसुध्दा ओमायक्रॉन व्हायरसचा मुकाबला करण्याबाबत प्रत्येकजण सज्ज असले पाहिजे. कोरोनापेक्षा ओमायक्रॉन व्हायरस महाभयानक आहे. असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे आपली काळजी आपण घेणे अत्यावश्यक आहे. जळगाव जिल्ह्यात काल एकाच दिवशी 9 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले. आतापर्यंत जिल्ह्यात 42 कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची ही संख्या सुध्दा जिल्ह्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा आहे. हा धोका टाळण्यासाठी प्रशासनाची वाट न पहाता स्वतःवर खरच बंधने घालून घेतली पाहिजेत.

त्यामुळे प्रत्येकजण घरातून बाहेर पडतांना तोंडाला मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नये. सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही. याची काळजी घ्यावी. सोशल डिस्टन्सिंगचे पालन प्रत्येकाने करावे. दोन जणांमध्ये तीन फुटाचे अंतर राहिल याची कटाक्षाने पालन करावे. त्याच बरोबर कुठल्याही वस्तुला हात लावल्यास हात धुवावे. सॅनिटायझरने हात स्वच्छ करावेत. किमान एवढ्या गोष्टी प्रत्येकाने करण्याचा संकल्प नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच केला तर आपण निश्चितच ओमायक्रॉनला हद्दपार करू शकतो, ओमायक्रॉनला हद्दपार करण्यासाठी प्रशासन आरोग्य यंत्रणेवर प्रत्येकांनी सज्ज रहावे. हे आव्हान प्रत्येकांने स्विकारले तर ओमायक्रॉन लवकरच हद्दपार होवू शकतो तो हद्दपार व्हावा तसेच आपले आरोग्य सुदृढ रहावे याच नववर्षाच्या शुभेच्छा..

Leave A Reply

Your email address will not be published.