धरणगाव पालिका पोटनिवडणूक : भाजपा विरोधात शिवसेनेची महाविकास आघाडीची खेळी? |

0
धरणगाव (प्रतिनिधी) लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह एबी फॉर्म जमा करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यानुसार शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडून उमेदवारांचे एबी फॉर्म जमा करण्यात आले. परंतू शिवसेना वगळता तिन्ही पक्षांच्या एबी फॉर्मवर प्रथम पसंतीच्या उमेदवारांची नावं अनेकांना आश्चर्य चकीत करणारी ठरली आहेत. तर शिवसेनेने भाजपला टक्कर देण्यासाठी ‘महाविकास आघाडी’चा ‘हाय लेव्हल’चा ‘गेम’ खेळलाय का? तसेच भाजपनेही प्रथम पसंतीच्या उमेदवाराचे नाव एबी फॉर्मवर टाकतांना धक्कातंत्राचा वापर केलाय का? आदी प्रश्नांवर धरणगावात एकच खमंग चर्चा सुरु झाली आहे.
आज शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करतांना अनेक राजकीय घडामोडी घडल्या. विशेष म्हणजे शिवसेना वगळता सर्वच राजकीय पक्षांनी एबी फॉर्मवर प्रथम पसंतीचे दिलेले नावं अनेकांना बुचकळ्यात पाडणारे आहेत. शिवसेनेकडून आज युवानेते निलेश चौधरी यांच्या नावावर एबी फॉर्ममध्ये प्रथम पसंती दिलेली आहे. तर दुसरे नाव शहर प्रमुख राजेंद्र महाजन यांचे आहे. गतवेळी निलेश चौधरी यांनी माघार घेतल्यामुळे यावेळी त्यांची उमेदवारी जवळपास निश्चितच मानली जात होती. त्यामुळे एबी फॉर्मवरील पसंती क्रमांक बघून कुणालाही फार आश्चर्य वाटले नाही. परंतु राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक निलेश चौधरी यांचे नाव एबी फॉर्मवर प्रथम पसंतीवर आहे. तर दुसरे नाव चक्क पालिकेतील माजी गटनेते तथा दोन वेळेस नगरसेवकसह उपनगराध्यक्ष राहिलेले दीपक वाघमारे यांचे नाव धक्कादायकरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. पक्षात ज्येष्ठ तसेच पालिकेच्या कारभाराचा गाढा अभ्यास,संपूर्ण गावात दांडगा जनसंपर्क असतांना देखील वाघमारे यांना उमेदवारी देतांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत. तर कॉंग्रेसकडून एबी फॉर्मवर दीपक जाधव यांचेच नाव फक्त आहे.
आजच्या घडीला या निवडणुकीत शिवसेनाला भाजप तगडी लढत देऊ शकते. अगदी पालिकेत भाजपचे सहा नगरसेवक देखील आहेत. त्यामुळे भाजपकडून गतवेळी अवघ्या काही मतांनी पराभूत झालेले तथा धरणगावकरांनी प्रचंड सहानभूती असलेले संजय महाजन यांचे नाव प्रथम पसंतीवर असणे अपेक्षित होते. परंतू भाजपच्या एबी फॉर्ममध्ये देखील धक्कादायकरित्या राष्ट्रवादीकडून माजी नगरसेवक राहिलेले मधुकर रोकडे यांचे नाव प्रथम पसंतीवर आहे. त्यामुळे भाजपने शिवसेनेला लढत देऊ शकणारा संजय महाजन सारखा तगड्या उमेदवाराचे नाव दुसऱ्या पसंतीवर ठेवल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवसेना एकीकडे महाविकास आघाडीच्या दृष्टीने सेटिंग आखत असतांना भाजपच्या गोटात मात्र, संजय महाजन यांच्या ऐवजी मधुकर रोकडे यांच्या नावावर पसंती देऊन काही वेगळी रणनीती अखातेय का? या सर्व प्रश्नांची उत्तरं माघारीच्या शेवटच्या दिवशी आर्थात १५ डिसेंबर रोजी मिळणार आहेत. तूर्त भाजप वगळता सर्वपक्षीय सेटिंग की, शिवसेनेचा मास्टर स्ट्रोक? याचीच चर्चा धरणगावात सुरु आहे.
एबी फॉर्मवरील प्रथम क्रमांकाच्या नावाचे महत्व
राजकीय पक्षाची अधिकृत उमेदवारी ठरविण्यासाठी ज्या-त्या पक्षाचा एबी फॉर्म उमेदवारी अर्जासोबत जोडणे आवश्यक असतो. एबी फॉर्मवरील प्रथम क्रमांकाच्या नावाचे खूप महत्व आहे. प्रथम क्रमांकाचे ज्या उमेदवाराचे नाव असते , तोच पक्षाचा अधिकृत उमेदवार असतो. जर त्या उमेदवाराचा अर्ज अवैध झाला किंवा त्याने माघार घेतली तरच दुसरा उमेदवार पक्षाचा उमेदवार होऊ शकतो. त्यामुळे आज धरणगावातील सर्वच पक्षाचे एबी फॉर्मवरील पहिल्या दोन उमेदवारांची नावे महत्वपूर्ण आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.