धरणगावात मुस्लिम, माळी समाजाला गृहीत धरणे शिवसेनेसाठी अडचणीचे!

0

धरणगाव (प्रतिनिधी) : लोकनियुक्त नगराध्यक्ष स्व.सलिम पटेल यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नगराध्यक्षपदासाठी पोट निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज माघारीचा आजचा शेवटचा दिवस असून यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. शहरातील बहुसंख्य मुस्लिम आणि माळी समाजाला गृहीत धरत शिवसेनेने नवख्या उमेदवार रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे. 14 महिन्यांसाठीच ही निवडणूक असली तरी या लढतीमुळे धरणगावातील राजकीय समिकरणे बदलणार आहेत. शिवसेनेच्या नव्या नेतृत्वाचा उदय या निवडणूकीत होणार का? याबाबत धरणगावकरांमध्ये उत्स्कुता निर्माण झाली आहे.

गेल्यावेळी सलिम पटेल उमदेवार असल्याने शहरातील 14 मोहल्ल्यात विखुरलेल्या मुस्लिम मतदारांनी आपल्या एकगठ्ठा मतांचे दान सेनेच्या छोळीत टाकले होते. सलिम पटेल यांच्या निधनानंतर रिक्त पदावर त्यांचे राजकीय वारस असलेल्या मुलगा तोसि पटेल यांना बिनविरोध करण्याची अथवा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा बहुसंख्य मुस्लिम मतदारांना होती. मात्र, याबाबत साधा विचार सुध्दा केला गेला नसल्याने मुस्लिम समाजात नाराजीचे चित्र आहे. यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्या पत्नी, माजी नगराध्यक्षा सौ.उषाताई वाघ आणि शहरप्रमुख राजेंद्र महाजन हे दोघे माळी समाजाचे प्रतिनिधी म्हणून उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र, उद्योगपती आणि माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी यांनी आपला मुलगा निलेश चौधरीच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठापणाला लावली. आता नाही तर कधीच नाही या आवेषानेच ते उमेदवारीसाठी आक्रमक होते. शिवाय उमेदवारी मिळाली नाही तर अपक्ष लढण्याची तयारी त्यांनी केल्याचे  सेना नेतृत्वाला कळाल्यामुळेच गुलाबराव वाघ, राजेंद्र महाजन यांच्या सारख्या माळी समाजाचे प्रतिनिधित्व करणार्‍या दिग्गज इच्छुकांनी माघार घेत निलेश चौधरींच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केला.

मात्र, सुरेश चौधरी यांच्या पुत्र प्रेमामुळे शिवसेनाच वेठीला धरली गेली असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुस्लिम मतदारांच्या भावनांचा अनादर करण्याची किंमत शिवसेना उमदेवाराला मोजावी लागणार आहे. शिवाय निलेश चौधरी विजयी झाले तर त्यांचा राजकीय भविष्यकाळ उज्वल मानला जात आहे. असे झाले तर शिवसेनेत एका नव्या दमाच्या नेतृत्वाचा उदय निश्‍चित असून त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली तर पालिकेसह शिवसेनेच्या राजकारणातील अनेक दिग्गज साईड ट्रॅक होणार हे निश्‍चित मानले जात आहे. परिणामी पोटनिवडणूक 14 महिन्यांसाठीच होत असली तरी आगामी 14 वर्षांच्या राजकारणाची दिशा आणि दशा निश्‍चित होणार असल्याने शिवसेनेला अतिशय सोपा वाटणार्‍या विजयासाठी आता संघर्ष करावा लागला तर आश्‍चर्य वाटायला नको.

Leave A Reply

Your email address will not be published.