दोन हजाराच्या थकबाकीसाठी फायनान्स कंपनीच्या नावाने धमकीचा फोन

0

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क 

फायनान्स कंपनीकडून दोन हजार रूपयांच्या थकबाकीसाठी ४५ दिवसांच्या पोलीस कोठडीची धमकी देणारा फोन आल्याची घटना येथे घडली असून या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

बोदवड येथील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते सुरेश कोळी यांनी बजाज फायनान्स कंपनीकडून १८ हजार ४०० रूपयांचा फायनान्स करून स्मार्टफोन घेतला होता. यासाठी १२३३ रूपयांचा इएमआय होता. सुरेश कोळी यांनी यातील सर्व हप्ते हे चार महिन्यांआधीच अदा केले आहेत. तर या फायनान्ससाठीची फी म्हणून २,२८९ रूपये इतके बाकी होते. हे पैसे नेमके कुठे भरावे याची माहिती कोळी यांना नसल्याने त्यांनी ही रक्कम भरली नाही.

२९ जुलै रोजी सकाळी सुरेश कोळी यांना ८८५९६५०१६२ या मोबाईल क्रमांकावरून फोन आला. यात त्यांना आपण मुंबई पोलीस मुख्यालयातून एसआय आनंद पांडे बोलत असल्याने हिंदीतून सांगण्यात आले. कोळी यांनी दुपारी बारा वाजेपर्यंत २,२८९ रूपये न भरल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करून ४५ दिवसांपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्यात येईल असे धमकावण्यात आले. यात वापरण्यात आलेली हिंदी भाषा, यातील शब्दप्रयोग आणि वॉरंटमध्ये ४५ दिवसांची पोलीस कोठडीची धमकी या बाबी सुरेश कोळी यांना संशयास्पद वाटल्या. यामुळे त्यांनी समोरच्या व्यक्तीला बोलते ठेवण्यासाठी पैसे भरण्याची तयारी दाखविली. तेव्हा त्याने तातडीने फोन-पे वरून पैसे पाठविण्याचे सांगितले. मात्र यातून आपली फसवणूक होऊ शकते हे लक्षात आल्याने त्यांनी आपल्याकडे फोन-पे नसल्याचे सांगितले. यावर त्यांनी ई-महासेवा केंद्रातून पैसे भरा, अन्यथा कारवाईला सामोरे जा अशी धमकी दिली.

या प्रकरणी सुरेश कोळी यांनी विचारपूस केली असता फायनान्स कंपनीतर्फे अशा प्रकारची कोणतेच निर्देश दिले नसल्याचे सांगण्यात आले. यामुळे हा फोन कॉल आला तरी कसा ? असा प्रश्‍न आता उपस्थित होत आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी श्री. कोळी यांनी केली असून आपण याबाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचेही ते म्हणाले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.