देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला- शरद पवार

0

कराड :- ‘मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी विकास व भ्रष्टाचाराचे रंजित मुद्दे उपस्थित करीत न खाऊंगा न खाने दुंगाचा नारा दिला. मात्र, नोटाबंदी, जीएसटी, फसव्या कर्जमाफीच्या माध्यमातून सरकारने सर्वसामान्य जनता, शेतकरी व छोट्या व्यापाऱ्यांना नेस्तनाबूत केले. त्यामुळे स्वतःला देशाचे चौकीदार म्हणणारेच खरे चोर आहेत. त्यांनीच राफेल हा आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा केला. देशाच्या चौकीदारानेच देश खाल्ला,’ अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केला.

सातारा लोकसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार प्रारंभानिमित्त कराड येथील जाहीर सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, की भाजप सरकार देशातील न्याययंत्रणा, केंद्रीय गुप्तचर विभाग, रिझव्‍‌र्ह बँक अशा स्वायत्त संस्थांवर दबाव आणून त्यांचा वापर स्वत:साठी करीत आहे. शेतकऱ्यांची पार दुरवस्था झाली आहे. गेल्या दोन वर्षांत केवळ महाराष्ट्रात १२ हजारांवर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. शेतमालाचे दर पाडून हे सरकार ‘खाणाऱ्यां’ची काळजी घेत आहे. जवानांच्या शौर्याचा स्वार्थी राजकारणासाठी वापर करणाऱ्या भाजप सरकारला उलथवून लावा, असे आवाहन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी येथे केले.

पवार म्हणाले, राफेल विमानाच्या खरेदीत मोठा गैर व्यवहार झाला आहे. राफेलची पहिली किंमत 350 कोटी होती. ती वाढवून 2016 मध्ये 600 कोटी सागंण्यात आली. मात्र प्रत्यक्षात त्याची खरेदी फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. त्यावेळी त्याची किंमत 1 हजार 660 कोटींची होती. ही किंमत कसी वाढली याचा खुलासा आम्ही सरकारकडे मागितला. त्यावेळी गोपनियता असल्याने माहिती न देता आमची मागणी धुडकावली. प्रत्यक्षात कोर्टाने माहिती मागितली त्यावेळी राफेल खरेदीची कागदपत्रे चोरीस गेल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले. त्यांनतर पुन्हा संरक्षण खात्याच्या कपाटातून फोटो कॉपी चोरीस गेल्याचे सागंण्यात आले. हा सगळा फसववेगिरीचा खेळ आहे, असे म्हणत त्यांनी सरकारला धारेवर धरले.

‘पुलवामा हल्याचे लष्कर व नौदलाचे श्रेय स्वतः लाटून आपली छपन्न इंचाची छाती असल्याचा ढिंदोरा मोदी देशभर पिटत आहेत. मग, कुलभूषण जाधव दोन वर्षे शत्रू राष्ट्राच्या ताब्यात आहेत. त्यांना सोडवण्यासाठी छपन्न इंचाची छाती का दाखवली नाही. या थापाड्या सरकारला जनता वैतागली असून, हीच जनता आता या सरकारला त्यांची योग्य जागा दाखवेल. त्यासाठी लोकांनी मनाची तयारी केली असून, आता परिवर्तन अटळ असल्याने केंद्रातील सत्तेत घरी बसविण्याचे काम महाआघाडीला आपल्या माध्यमांतून करणार आहे. सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार उदयनराजे भोसले यांचे संपूर्ण राज्यातील जनतेच्या मनावर गारुड असून, मागच्या वेळेपेक्षा जास्त मतांनी त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे.’

या वेळी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण, माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार राजू शेट्टी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार हसन मुश्रीफ, बाळासाहेब पाटील, शशिकांत शिंदे, पिपल्स पार्टीचे जोगेंद्र कवाडे, सुमनताई पाटील, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, आनंदराव पाटील, जयकुमार गोरे, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार प्रभाकर घार्गे, डॉ. इंद्रजित मोहिते, दलीत महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे, मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, पालिकेतचे उपाध्यक्ष जयवंत पाटील, उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.