तौक्ते चक्रीवादळाचा मुंबईकरांना धडकी ; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

0

मुंबई : अरबी समुद्रात उठलेले तौक्ते नावाचे चक्रीवादळ सोमवारी मुंबई लागत दाखल झाले; आणि मुंबईसह ठाणे व पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत ठिकाणी वादळी वारे वाहू लागले. सोबतच वेगाने पडणारा पाऊस मुंबईकरांना धडकी भरवून लागला.

सकाळी दहा वाजेपर्यंत मुंबई शहरासह उपनगरातील बहुतांश ठिकाणांना मुसळधार पावसाने आणि वादळी वाऱ्याने झोडपून काढले होते. सकाळी दहानंतर देखील पावसाचा आणि वादळी वा-याचा वेग कायम होता. परिणामी भल्या पहाटे घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी मुंबापुरी सोमवारी मात्र अत्यंत धीम्या गतीने धावत होती. त्यात उपनगरी रेल्वेच्या सेवेत अडथळे आल्याने समस्यांमध्ये आणखीनच वाढ झाली. दुसरीकडे सुरक्षेच्या कारणास्तव मोनो रेलची सेवा देखील खंडित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त नेहमी भरभरुन वाहणाऱ्या मुंबईच्या रस्त्यांवर आज केवळ पाऊस आणि वारेच धावत असल्याचे चित्र होते.

मुंबई शहर आणि उपनगरात चक्रीवादळाने सोमवारी सकाळपासूनच रुद्रावतार धारण करण्यास सुरुवात केली. रविवारी मध्यरात्री चक्रीवादळाचा प्रवास मुंबईच्या समुद्रातून गुजरात कडे होत असतानाच सोमवारी सकाळी साडेआठ वाजता हे चक्रीवादळ मुंबईपासून अवघ्या १६० किमी अंतरावर दाखल झाले. परिणामी चक्रीवादळाचा जोर वाढत गेला. रविवारी मध्यरात्री एक वाजेपर्यंत केवळ मुंबईत वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याने पहाटे तीन वाजता जोर पकडला. सोबत पावसाचे देखील आगमन झाले. सोमवारी पहाटे चार वाजल्यापासून मुंबई शहर आणि उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसाने आपला खेळ मांडला.

पहाटे चार वाजल्यापासून मुंबईत वेगाने वाहणारे वारे सकाळचे साडेआठ वाजले आणि आणखी वेगाने वाहू लागले. याच वेळी चक्रीवादळ मुंबईपासून १६० किलोमीटर अंतरावर असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. दक्षिण मुंबईच्या समुद्रापासून उत्तरेकडील टोकापर्यंत उसळलेल्या लाटा आणि वेगाने वाहने वारे याच वेळी मुंबईकरांना धडकी भरवत होते. सोमवारी सकाळी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाची हजेरी लागत असतानाच दुपारी बारा वाजेपर्यंत वादळी वाऱ्याचा वेग आणि पाऊस मुंबई शहर उपनगरात व लगतच्या जिल्ह्यात कायम राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. सदर अंदाज हवामान खात्याकडून वर्तविला जात असताना मुंबईत मोठ्या वेगाने वारे वाहत होते. या काळात पावसाचा वेग कमी असला तरी अंगावर येणारे वारे मुंबईकरांना धडकी भरवत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.