तुम्ही लस कधी घेणार? अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

0

पुणे । देशभरात कोरोना लसीकरणााला अल्प प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या टप्प्यात डॉक्टर, नर्स, पॅरामेडिकल स्टाफ, पोलीस यांनाच कोरोना लस दिली जात आहे.

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लस घेण्याबाबत प्रश्न केला असता ”आम्हाला परवानगी मिळेल, त्या दिवशी घेऊ. अजून आम्ही डॉक्टर, नर्स, पोलीस यामध्ये मोडत नाही. ज्यावेळी आदेश येतील, की यांनीही लस घेतली पाहिजे, आम्ही लगेच लस घेऊन तुम्हाला सांगू की मी आज लस घेतली,” असं रोखठोक आणि स्पष्ट उत्तर अजित पवार यांनी दिलं. ते पुण्यात बोलत होते.

“लसीबाबत काही अडचणी येत आहेत. एका सेंटरवर शंभर जणांना लस दिली जाते. तीन दिवसांच्या लसीकरण टप्प्यात केंद्राकडून प्रत्येकाला तारखांची माहिती येत होती. ग्रामीण भागात शंभर पैकी 61 जणांनी लस घेतली. शहरी भागात सुरुवातीला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला. दुसऱ्या दिवशी मात्र तो कमी झाला. पिंपरी चिंचवडमध्ये तर 27 टक्केच लसीकरण झालं, अशी माहितीही अजित पवारांनी यावेळी दिली.

”कमी लसीकरणाबाबत अधिकाऱ्यांना विचारलं, तेव्हा काही कारणं समजली. संबंधित व्यक्ती आली आणि केंद्रावर आल्यावर म्हणाली की मला लस नाही घ्यायची. काही जणांना रात्री उशिरा कळवल्याने सकाळी येता आलं नाही. पण लस घेतलेल्या तीन-चार डॉक्टरांशी माझं बोलणं झालं. त्यांनी कुठलेही साईड इफेक्ट नसल्याचं सांगितलं. एका डॉक्टरला थोडासा ताप, कणकण जाणवत होती. मात्र तिसऱ्या दिवसापासून ते ठणठणीत झाले,” असंही अजित पवारांनी सांगितलं. ”लसीकरणाचे अ‍ॅप राष्ट्रीय स्तरावरील आहे, त्यामुळे काही तांत्रिक अडथळे आहेत. कोणत्याही नवीन अ‍ॅपवर अडचणी येतातच, मात्र काही दिवसांनी सुरळीत होईल”, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.