तहसीलदारासह चौघा तलाठ्यांवर वाळूमाफियांची दगडफेक

0

उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रातील घटना ; जप्तीचे ट्रॅक्टर नेले पळवून ; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

पाचोरा : येथील प्रांताधिकाऱयांच्या घरावर दगडफेकीची घटना ताजी असताना बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळूमाफियांनी तहसीलदार व चार तलाठ्यांवर गिरणा नदीपात्रात वाळूमाफियाच्या २५ जणांच्या जमावाने दगडफेक करून जप्त केलेले २ ट्रॅक्टर पळवून नेल्याची थरारक घटना उत्राण येथील नदीपात्रात मंगळवारी रात्री उशिरा येथे घडली . तहसीलदार बी. ए. कापसे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचोरा पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत तहसीलदार कापसे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात पाचोरा हद्दीतून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन वाळू चोरी होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला खबऱ्यांकडून प्राप्त झाली होती. त्या माहितीच्या आधारे तहसीलदार कापसे यांनी आपले सहकारी तलाठी सोबत घेऊन उत्राण जवळच्या गिरणा नदीपात्रात जाऊन कारवाई करण्याचा प्रयत्न केला. यावेळी गिरणा नदीपात्रात एक वाळूने भरलेला ट्रॅक्टर व एक रिकामा ट्रॅक्टर या पथकाला आढळून आला. तहसीलदार कापसे यांनी वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरवर दोन तलाठी बसवून ते पाचोरा तहसील कार्यालयात जमा करण्यासाठी आणण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुमारे पंचवीस जणांचा जमाव जमला व त्यांनी एकेरी व शिवराळ भाषेत तहसीलदार कापसे व त्यांच्यासोबत असलेल्या तलाठ्यांना शिवीगाळ करत अरेरावीने दमदाटी करत ट्रॅक्टर वर बसलेले दोन्ही तलाठी खाली ओढत जमा करण्यासाठी आणले जाणारे ट्रॅक्टर पळवून नेले.

वाळूमाफियांच्या विरोधात गुन्हा

तहसीलदार व पथकाने आपला पाठलाग करू नये, म्हणून या वाळूमाफियांनी तहसीलदार व तलाठ्यावर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. या प्रकारासंदर्भात तहसीलदार बी. ए. कापसे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी वाळूमाफियांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
दरम्यान पाचोरा येथे गजबजलेल्या वस्तीत प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या निवासस्थानावर मध्यरात्री वाळूमाफियांनी दगडफेक केल्याची घटना घडली होती. या घटनेची चर्चा थांबत नाही तोच उत्राण जवळ पाचोरा हद्दीतील गिरणा नदीपात्रात तहसीलदारांसह त्यांच्या पथकावर दगडफेक झाल्याची घटना घडल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. आता महसूल व पोलीस यंत्रणा वाळूमाफियांवर काय कारवाई करते याकडे आता तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.