तरूणावर चाकू हल्ला; गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  

जळगाव तालुक्यातील चिंचोली येथे मराठी शाळेजवळ किरकोळ वादावरून तरूणावर चाकूहल्ला केल्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निलेश दिलीप गडकर (वय २१, रा. चिंचोली ता.जि. जळगाव) हा आपल्या आईवडीलांसह वास्तव्याला आहे.  तो नूतन मराठा महाविद्यालयात पहिल्या वर्षाला शिक्षण घेत आहे. रविवारी २ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास निलेश हा घरी असताना त्याच्या गावातील गौरव सुनील शेळके याने फोन करून बोलून घेतले. त्यानुसार निलेश गावातील बसस्थानकाजवळ भेटायला गेला.

त्यावेळी गौरव सोबत दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके यांच्यासह चार ते पाच जण हातात बॅट, हॉकी स्टिक आणि चाकू घेऊन उभे होते. दरम्यान यातील गौरव म्हणाला कि, तू ३१ डिसेंबरच्या पार्टीला जास्त बोलत होता, असे म्हणत गौरवने त्याच्या हातातील चाकूने निलेशच्या डोक्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर इतरांनी बॅट व हॉकीस्टीकने बेदम मारहाण केली.

याप्रसंगी गावातील काही नागरिकांनी धाव घेऊन निलेशची सुटका केली व  जखमी अवस्थेत जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सोमवारी ३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निलेश गडकर यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी गौरव सुनील शेळके, दिनेश शेळके, गोपाल ज्ञानेश्वर शेळके सर्व रा. चिंचोली ता. जळगाव यांच्यासह ४ ते ५ जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल गफुर तडवी करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.