डॉ पायल तडवी आत्महत्याप्रकरणी तिन्ही महिला डॉक्टरांना अटक

0

मुंबई – नायर रुग्णालयातील डॉ पायल तडवी आत्महत्या प्रकरणी तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे.  याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. दरम्यान तिन्ही आरोपी महिला डॉक्टरांना सत्र न्यायालयात हजर केलं जाईल. या तिघींनी सातत्याने केलेली जातीवाचक शेरेबाजीच डॉ तडवी हिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरल्याचा आरोप आहे.

तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली होती.

डॉ. पायल यांनी या महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून म्हणजेच मागील वर्षभरापासून या तिघी पायलला छळत होत्या. जातीवाचक टीपण्णी करत होत्या. या तिघी कशाप्रकारे त्रास देतात हे पायलने सांगण्याचा प्रयत्न केला मात्र तिचे म्हणणे कुणीही ऐकून घेतले नाही. दरम्यान तिच्या आत्महत्येनंतर या तिघीही फरार होत्या. डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहेर, डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात अॅट्रॉसिटी आणि रॅगिंगविरोधी कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात केला होता.

दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी या उद्देशाने एक पत्र नायर रूग्णालयाच्या संचालकांना लिहिलं आहे. पायल तडवीच्या मृत्यूबाबत नायर रूग्णालयाच्या अधिष्ठात्यांनाही पत्र लिहिण्यात आलं होतं. पायलच्या आई वडिलांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसने पायल तडवीचा मृत्यू ही हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच या रूग्णालयातले डॉक्टर सलमान यांनीही हा आरोप केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.