ठाकरे सरकारला धक्का; राज्यपालांचा आवाजी मतदानास विरोध

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

विधीमंडळाच्या अधिवेशनातील सोमवारचे काम संपण्यास काही तासांचा अवधी बाकी आहे. त्यानंतर मंगळवारी मुदत न वाढविल्यास उद्याचा दिवस हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा ठरण्याची शक्यता आहे. मात्र त्यापुर्वी विधानसभा अध्यक्ष निवडीत राज्यपालांनी ठाकरे सरकारकला धक्का दिला आहे. कारण, या निवडीसाठी आवाजी पद्धतीने मतदान घेण्यास राज्यपालांनी विरोध दर्शवला आहे. विशेष म्हणजे, अध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरायचा होता. परंतु, आता राज्यपालांच्या भूमिकेमुळे राज्य सरकारसमोर नवा पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.

राज्यपालांच्या या निर्णयामुळे आता अध्यक्षपदाची निवडणूक रेंगाळण्याची परिस्थिती दिसत आहे. काल महाविकास आघाडीच्या वतीने मंत्री बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे व छगन भुजबळ यांना या निवडणुकीसंदर्भात पत्र सादर करून, परवानगी देण्याची विनंती केली होती. त्यावर आज राज्यपालांकडून सरकारला पत्र पाठवून उत्तर कळवण्यात आलं आहे.

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्यासाठी नियमात बदल करण्यात आला होता. मात्र हा नियम बदलण्यासाठी करण्यात आलेली प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे राज्यपालांनी राज्य सरकारला कळवलं आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पेच निर्माण झाल्याचं दिसत आहे.

राज्यपालांच्या या उत्तरानंतर आता महाविकास आघाडीकडून राज्यपालांना तिसरं पत्र पाठवलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. या अगोदर मुख्यमंत्र्यांनी दोन शिफारस पत्रे पाठवलेली आहेत. तर, आता तिसऱ्या पत्रात ज्या कायदेशीर बाबींवर राज्यपालांकडून शंका उपस्थित केली जात आहे, त्याबाबत सविस्तर मुद्दे मांडले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

विधानसभा अध्यक्ष निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने घेण्याऐवजी खुल्या किंवा आवाजी मतदानाने घेण्याच्या नियमबदलाबाबत कायदेशीर अभिप्राय घेण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काल घेतला होता.

तर, ही निवडणूक गुप्त मतदानानेच व्हावी, अशी भाजपाची मागणी आहे. आपल्या आमदारांवर महाविकास आघाडी सरकारचा विश्वास नसल्याने हा निर्णय घेतल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे. विधानसभा नियमांमध्ये बदल करण्याबाबत बैठक घेण्याचा अधिकार अध्यक्षांनाच असून तो उपाध्यक्षांना नाही. त्यामुळे निवडणूक नियमातील बदल घटनाबाह्य असल्याचे मत फडणवीस यांनी व्यक्त केलेले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.