ठाकरे यांच्यासोबत भुजबळ, देसाई, पाटील आणि एकनाथ शिंदेही घेणार मंत्रिपदाची शपथ

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाविकास आघाडीच्या सरकारचा शपथविधी आज, गुरुवारी शिवाजी पार्कवर सायंकाळी पार पडणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. दरम्यान, ठाकरे यांच्यासोबत शिवतीर्थावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, जयंत पाटील, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदेही मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण हे मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, शिवसेना नेते आदित्य ठाकरे हे मंत्रिपदाची शपथ घेणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मॅरेथॉन बैठक झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे आज शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असल्याने त्यांच्यासोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येक दोन मंत्र्यांना शपथ देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार राष्ट्रवादीकडून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते जयंत पाटील मंत्रिपदाची शपथ घेतील. तर शिवसेनेकडून सुभाष देसाई आणि एकनाथ शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. आदित्य ठाकरे यांच्याकडे शिवसेना पक्ष वाढीची धुरा राहणार असल्याने त्यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात येतं.

Leave A Reply

Your email address will not be published.