ज्ञानदांची भाऊबीज मेहूण मुक्ताईचरणी अर्पण

0

भुसावळ दि.११ –

संपूर्ण जगाला मानवतावाद देणार्‍या लहानगी भगिनी आदिशक्ती मुक्ताईंचे बंधूप्रेम आजही जपले जात आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यंदाही भाऊबीजेच्या पार्श्‍वभूमीवर श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यातर्फे आपली भगिनी तापीतीरावरील संत आदिशक्ती मुक्ताई यांना भाऊबीज पाठविण्यात आली आहे. आपल्या भारतीय संस्कृतीत सणांना मोठे महत्व आहे. त्यातील एक महत्वाचा सण म्हणजे भाऊबीज. बहिण-भाऊ यांचे नातेसंबंध अधिक दृढ करण्याचे काम हा सण करतो. महाराष्ट्रात बाराव्या शतकात अवतार घेतलेल्या चार भावंडांनी साहित्य व अध्यात्मिक क्षेत्रात क्रांती केली. संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्‍वर, संत सोपानदेव आणि आदिशक्ती संत मुक्ताई. या चारही भावंडांना तत्कालिन समाजाचा अतोनात त्रास सहन करावा लागला होता. अशातही या भावंडांनी जगाचा उद्धार करण्याचे काम केले. समाजाच्या त्रासाला कंटाळून झोपडीत दार बंद करून बसलेल्या संत ज्ञानेश्‍वर महाराज यांना लहानग्या मुक्ताईने ताटीचे अभंग रचून आळवणी केली. मोजके व अर्थपूर्ण शब्द आणि प्रत्येक अभंगाच्या शेवटी आग्रहपूर्वक केली जाणारी ताटी उघडा ज्ञानेश्‍वरा ही विनवणी यामुळे ज्ञानेश्‍वर महाराज ताटी उघडून बाहेर आले. त्यांनी मुक्ताईंच्या डोक्यावर हात पिरवून प्रेमाने कौतुक केले. त्यानंतर श्रीमद्भगवद्गीतेवर टिका करून जगत्मान्य असा ज्ञानेश्‍वरी ग्रंथ लिहिला. ज्ञानेश्‍वरांसारखा ज्ञानी व योगी भाऊ आणि जगाच्या कल्याणासाठी तुम्ही तरूनी विश्‍व तारा अशी हाक देणारी प्रेमळ बहिण यांचा असा उत्कृष्ट संवाद जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. ही पार्श्‍वभूमी सांगण्याचा हेतू हाच की, मुक्ताईंचे बंधूप्रेम संपूर्ण जगभर आज प्रसिद्ध आहे. हेच बंधूप्रेम सातशे वर्षानंतरही जपण्याचे काम श्रीक्षेत्र मेहूण तापीतीर येथील देवस्थानतर्फे केले जात आहे. श्री क्षेत्र आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याकडून आदिशक्ती संत मुक्ताई यांना भाऊबीज पाठविण्यात आली आहे. ही भाऊबीज संत मुक्ताई देवस्थानचे सचिव हभप रामराव महाराज, विश्‍वस्त हभप शारंगधर महाराज, हभप सुधाकर महाराज, हभप लक्ष्मण महाराज, दत्तू पाटील, डॉ. जगदीश पाटील भुसावळ आदींनी संत मुक्ताईंच्या चरणी ठेवली. भाऊबीजच नव्हे तर रक्षाबंधन सणाला दरवर्षी श्रीक्षेत्र आळंदी येथे  श्री संत ज्ञानेश्‍वर महाराज, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्‍वर येथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज आणि श्रीक्षेत्र सासवड येथे श्रीसंत सोपानदेव महाराज यांच्याकडे राखी पाठविण्यात येतात.

भाऊ-बहिणीचे नाते जगासाठी प्रेरक –

संत आदिशक्ती मुक्ताई व संत ज्ञानेश्‍वर यांचे भाऊबहिणीचे नाते संपूर्ण जगासाठी प्रेरक व मार्गदर्शक आहे. भाऊबीजेच्या माध्यमातून भावाबहिणीतील प्रेमाचे अतूट बंधन जोपासण्याचे काम नित्य नेमाने केले जात आहे. ही परंपरा याहीपुढे निरंतर सुरू ठेवण्यात येणार असल्याचे हभप शारंगधर महाराज यांनी सांगितले. अध्यात्माची परमोच्च पातळी गाठलेल्या बहिणी-भावाच्या प्रेमाची आठवण आजही भाऊबीजेच्या माध्यमातून जोपासली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.