जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

0

जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत आता जवळ जवळ महाविकास आघाडीचे पारडे जड झाले आहे. सर्व पक्षीय पॅनल तयार करण्याचे प्रयत्न फसल्यानंतर भाजपतर्फे सर्व 21 जागा लढविण्याचे स्वप्न भंगले आहे. कारण 21 पैकी 6 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचीच बिनविरोध निवड निश्चित झाली असून आता 15 जागांसाठीच निवडणूक होईल. त्याच उमेदवारी अर्ज छाननीमध्ये भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, खा.रक्षा खडसे आदींचे उमदेवारी अर्ज बाद झाल्याने भाजपला धक्काच बसलाय.

नाशिक विभागीय आयुक्तांकडे केलेल्या अपिलात सहनिबंधकांनी हे अर्ज अवैध ठरल्याने भाजपच्या पदरी निराशा पडली आहे. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे पॅनलमध्ये समावेश असला तरी निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व दिसून येत आहे. कारण महाविकास आघाडीतील 6 उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झालेल्यात 4 राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असून 2 जागावर शिवसेनेचे उमेदवार आहेत. मुक्ताईनगर मतदार संघातून माजी मंत्री आणि जिल्हा बँकेवर नेतृत्व गाजवणारे एकनाथराव खडसे यांच्या विरोधात भाजपतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाना पांडूरंग पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने एकनाथराव खडसे यांची निवड बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे.

राष्ट्रवादीचे एकनाथराव खडसे, जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पाटील, आ. अनिल भाईदास पाटील आणि संजय पवार यांची निवड बिनविरोध होत आहे. विद्यमान चेअरमन ॲड.रोहिणी खडसे यांची महिला मतदार संघातून उमेवारी असल्याने त्यांचाही विजय निश्चित समजला जातोय. त्यामुळे जिल्हा बँक निवडणुकीत भाजपची व्ह्यूवरचना पूर्वतः असफल झाली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण सर्वपक्षीय पॅनल तयार झाले असते. तर भाजपला 21 पैकी 7 जागा मिळाल्या असत्या. तसेच पाच वर्षांपैकी सव्वा वर्षभर भाजपच्या वाट्याला चेअरमन आणि व्हा.चेअरमन पद मिळाले असते.परंतु राष्ट्रवादी काँग्रेसला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री एकनाथराव खडसेंना भाजप नकोच होते. त्यामुळे कोअर कमेटीच्या बैठकीत तोडगा मान्य झालाय. किरकोळ बाबींवर घोडे अडलेय. तोही प्रश्न सुटेल असे पालकमंत्री गुलाबराव पाटील माध्यमाला सांगत होते. परंतु राष्ट्रवादीच्या अंतर्गत हे मान्य नव्हते. कारण भाजपच्या 7 जागा आणि शिवसेनेच्या 5 जागा एकत्र केल्या. तर 12 जागा होतात.

भाजप-शिवसेना एकत्र येवून राष्ट्रवादी आणि काँग्रेसला आपापसात टाकून बँकेवर भाजप-सेना राज्य करतील ही सुप्त किर्ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या विशेषतः एकनाथराव खडसेंच्या मनात असावी अशी शंका व्यक्त केली जात होती. त्यामुळे सुध्दा सर्वपक्षीय पॅनल फिसकटले असावे. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव पुढे करून भाजपबरोबर युती करायची नाही असे सांगून सर्वपक्षीय पॅनलला विरोध झाला.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचे अंतिमचित्र येत्या 8 नोव्हेंबरला स्पष्ट होईल. परंतु 8 तारखेला चित्र स्पष्ट झाले तरी भाजपला मात्र यात जोरदार फटका बसणार आहे. कारण भाजपकडे आता निवडणूक रिंगणात सक्षम उमेदवारच नाहीत. जळगाव सोसायटी मतदार संघातून भाजपचे आमदार राजूमामा भोळे विद्यमान संचालक आहेत. परंतु आता निवडणुकीत आ.राजूमामा भोळेंची स्थिती डामाडौल आहे. ते स्वतःच निवडणूक लढविण्यास इच्छुक नसल्याने खाजगीत सांगतात. परंतु पक्षाच्या आदेशामुळे ते निवडणूक लढवित आहेत. जामनेर सोसायटी मतदार संघातून आ.गिरीश महाजन हे सक्षम असून त्यांचा विजय निश्चित समजला जातोय. परंतु आ.स्मिता वाघ, खा.रक्षा खडसे या भाजपच्या दिग्गजांची उमेदवारी बाद झाल्याने भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे बँक निवडणूकीत महाविकास आघाडीचे आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहणार आहे. चोपडा तालुका सोसायटी मतदार संघातून काँग्रेसचे डॉ.सुरेश शामराव पाटील हे विद्यमान संचालक आहेत. महाविकास आघाडी पॅनलमध्ये त्यांना उमेदवारी पुन्हा मिळेल हे अपेक्षित होते. तथापि भाजपचे घनश्याम अग्रवाल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादीतर्फे त्यांना सोसायटी मतदार संघातून उमेदवारी दिले जात आहे. काँग्रेसवर हा अन्याय होणार असला तरी काँग्रेसला देण्यात येणाऱ्या दोन जागा 3 दिल्या जातील. असे सांगण्यात येते.

एकंदरित बँक निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनलतर्फे निवडणुक लढविण्यात येणार असली तर त्यात राष्ट्रवादीचे वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे बँकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारच राहतील. त्यासाठी ज्येष्ठ नेते माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या नावाची निश्चित झाल्यानेही बोलले जात आहे. त्यामुळे भाजपतर्फे जळगाव जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक राहिलेली नाही. ठराविक लोकांची बँक होय असे म्हणून टिका करण्याशिवाय गंत्यंतर राहिलेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.