जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची कोविड -१९ रुग्णालयाला भेट

0

जळगाव (प्रतिनिधी) ।  जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी काल पदभार स्वीकारल्यानंतर आज कोविड -१९ रुग्णालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांशी सवांद साधून त्यांची सर्व अडचणी समजून घेतल्या. तसेच त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाला व्हीआरडीएल लॅबची चाचणी क्षमता वाढविण्याबाबत सूचना केल्यात.

जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आज त्यांच्या कार्यालयात सकाळी डीन जयप्रकाश रामानंद, सिव्हिल सर्जन, डीएचओ व इतर अधिकाऱ्यांची कोविड संदर्भात बैठक बोलविली होती. या बैठकीनंतर त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. यावेळी प्रशासक तथा जि.प.सीईओ बी.एन.पाटील, अधिष्ठाता डॉ.जयप्रकाश रामानंद, वैद्यकीय अधीक्षक डॉ.दत्तात्रय बिराजदार, डॉ.मधुकर गायकवाड, डॉ.मारुती पोटे यांनी रुग्णालयाची माहिती दिली. खिडक्या, बाथरूमचे दरवाजे तुटलेले दिसल्याने त्यांनी तत्काळ दुरूस्ती करा अन्यथा नोटीस द्या म्हणून सूचित केले. रुग्णांसाठी मदत म्हणून २०आरोग्य स्वयं सेवकांची भरती करा म्हणून सांगितले. रुग्ण दुसऱ्या कोविड रुग्णालयात हलविताना डॉक्टरांची कमतरता असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. करोनाच्या चाचण्या वाढवा, अत्यवस्थ रुग्णांनाच जिल्ह्याच्या कोविड रुग्णालयात आणावे, मृत्युदर टाळण्यासाठी एकेक रुग्ण वैयक्तिक लक्ष देत वाचवा, अत्यवस्थ रुग्णांची संध्याकाळी माहिती द्या अशा सूचना वैद्यकीय अधीक्षकांना दिल्या. जिल्हाधिकारी कोविड रुग्णालयात आल्याने एकच धावपळ उडाली होती. तर, नवीन अधिष्ठाता, नवीन जिल्हाधिकारी यांमुळे आता करोनाची वाढती संख्या, मृत्युदर आता कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी रुग्णाचे नातेवाईक सेंटरमध्ये येऊ नये याकरिता प्रत्येक वार्डात काही मोबाईल ठेवण्यात यावेत जेणेकरून रुग्णांशी त्यांच्या नातेवाईकांना संपर्क साधता येईल. प्रत्येक वार्डाच्या बाहेर एक पांढरा फलक लावण्यात यावा ज्यावर तो कोणत्या गावाचा आहे हे लिहावे. जेणेकरून एका वार्डात किती रुग्ण आहेत हे समजेल. सर्व रुग्णांना कपडे द्यावेत अशी सूचना केली. पास सिस्टीम व सिक्युरिटी अजून वाढविण्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्हीआरडीएल लॅबची चाचणी क्षमता कशी वाढवता येईल याबाबत जिल्हाधिकारी राऊत यांनी चर्चा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.