जळगाव जिल्ह्यात कोरोनाची नवी नियमावली जाहीर, पाहा काय आहेत बंधनं?

0

जळगाव | प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या कोविड रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा राज्य सरकारअलर्ट झालं आहे. यातच दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. केंद्र सरकारनं याबाबत देशातील सर्व राज्य सरकारला पत्र लिहून सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत.  कोरोनाच्या नवीन घातक व्हेरियंटच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाने सतर्कता बाळगली असून या अनुषंगाने आज जिल्हाधिकार्‍यांनी नवीन नियमावली जाहीर केली आहे. याचे सर्वांनी पालन करणे बंधनकारक करण्यात आले असून याचे पालन न केल्यास दंडाची तरतूद करण्यात आली आहे. जळगावच्या जिल्ह्याधिकार्‍यांनी एका नोटिफिकेशनच्या माध्यमातून कोरोनासाठी नवीन नियमावली जाहीर केली आहे.

संपूर्ण आदेश : ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील पत्र दिनांक 14 मार्च, 2020 अन्वये करोना विषाणू (कोव्हिड 19) चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 हा दिनांक 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2,3 व 4 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित करणेत आलेली आहे आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून जिल्हाधिकारी हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोव्हिड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत.

ज्याअर्थी, उपोद्घातात नमूद शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 अन्वये अध्यक्ष, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी यापूर्वी लागू केलेले निबंधाकरीता राज्य शासनाकडील यापूर्वीचे सर्व आदेशांचे अधिक्रमण करुन तात्काळ प्रभावाने सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार खुले करण्यात आलेले आहे. त्याअर्थी, मी अभिजीत राऊत, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, जळगाव आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005, भारतीय साथरोग अधिनियम, 1897 अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन शासन आदेश दिनांक 27 नोव्हेंबर, 2021 मध्ये नमूद केल्यानुसार कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भावास प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लागू करण्यात आलेले निर्बंधाकरीता पारीत केलेले सर्व आदेशांचे याआदेशाद्वारे अधिक्रमण करीत असून सर्व आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा व मनोरंजनविषयक क्षेत्रातील कार्यांना कोविड-19 सार्वत्रिक साथरोग येण्यापूर्वी, विविध स्थानिक किंवा इतर सक्षम प्राधिकरणांनी ठरविलेल्या सर्वसाधारण वेळानुसार खुले करण्याकामी खालील प्रमाणे शर्तीना अधिन राहून आदेश पारीत करीत आहे.

1) कोविड अनुरुप वर्तनाचे पालन :

राज्य शासनाने व केंद्र शासनाने वेळोवेळी निर्धारीत केलेल्या कोविड अनुरुप वर्तनाचे सेवा प्रदाते, परिवास्तूंचे (जागांचे) मालक, परवानाधारक, आयोजक इत्यादींसह सर्वांनी तसेच सर्व अभ्यांगत, सेवा घेणारे, ग्राहक, अतिथी इत्यादींनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. कोविड अनुरुप वर्तनाची तपशिलवार मार्गदर्शक तत्वे तसेच त्यांचे उल्लंघन केल्यास करावयाचे दंड, कोविड अनुरुप वर्तनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आणि यात यापुढे नमूद केलेल्या दंडानुसार असेल.

2) संपूर्ण लसीकरणाची आवश्यकता :

अ. तिकीट असलेल्या किंवा तिकीट नसलेल्या, कोणत्याही कार्यक्रमाच्या, समारंभाच्या किंवा प्रयोगाच्या आयोजनाशी संबंधित असलेल्या सर्व व्यक्ती तसेच सर्व सेवा प्रदाते व सहभागी होणा-या व्यक्ती (जसे की, खेळाडू,अभिनेते इत्यादी), अभ्यांगत, पाहुणे, ग्राहक यांचे, यात पुढे दिलेल्या व्याख्येनुसार संपूर्ण लसीकरण केलेले असावे.

ब. ज्या ठिकाणी कोणत्याही नागरिक / व्यक्तीस येण्याचा किंवा सेवा घेण्याचा हक्क आहे असे कोणतेही दुकान, आस्थापना, मॉल्स, समारंभ, संमेलने (मेळावे), इत्यादी ठिकाणी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तीद्वारे व्यवस्थापन केले पाहिजे आणि अशा ठिकाणी येणारे सर्व अभ्यांगत, ग्राहक यांचे संपूर्ण लसीकरण झालेले असावे.

.सर्व सार्वजनिक परिवहन सेवांमध्ये संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींनाच परवानगी असेल.

ड. राज्य शासनाने तयार केलेला युनिव्हर्सल पास https://wpassmsdma.mahait.org किंवा telegram-MahaGovUniversalPass Bot) हा संपूर्ण लसीकरण झाल्याच्या स्थितीचा वैध पुरावा असेल. अन्यथा छायाचित्र असलेले वैध ओळखपत्र असलेले कोविन प्रमाणपत्र देखील त्यासाठी वैध पुरावा मानला जाईल. 18 वर्षापेक्षा कमी वयाच्या नागरिकांसाठी, इतर शासकीय संस्थेने किंवा शाळेने दिलेले छायाचित्र ओळखपत्र आणि वैद्यकीय कारणासाठी ज्या व्यक्ती लस घेऊ शकत नाही, त्या व्यक्तींसाठी प्रमाणित वैद्यकीय व्यवसायिकाकडील प्रमाणपत्र प्रवेशासाठी कागदोपत्री पुरावा म्हणून वापरात येईल. इ. जेथे सर्वसामान्य जनतेतील कोणतीही व्यक्ती भेट देत नाही अशी कार्यालये व इतर आस्थापना तसेच खाजगी परिवहन सेवा यांच्यासाठी संपूर्ण लसीकरण झालेल्या व्यक्तींसाठी त्या खुल्या असण्याची शर्त नसली तरी त्यांना देखील संपूर्ण लसीकरण करणे आवश्यक आहे.

 

3) महाराष्ट्र राज्यात प्रवास : कोणत्याही आंतरराष्ट्रीय गंतव्यवस्थानावरुन राज्यात येणा-या सर्व प्रवाशांचे याबाबतीतील भारत सरकार यांचेकडील निर्देशानुसार विनियमन करण्यात येईल. राज्यात येणा-या सर्व देशांतर्गत प्रवाशांचे एकतर यात यापुढे व्याख्या केल्यानुसार संपूर्ण लसीकरण केले जाईल किंवा 72 तासांसाठी वैध असलेले RTPCR चाचणी निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगतील.

4) कोणताही कार्यक्रम, समारंभ इत्यादीमधील उपस्थितीवरील निबंध : अ.चित्रपटगृहे, नाट्यगृहे,मंगलकार्यालये, सभागृहे इत्यादी बंदीस्त / बंद जागेत घेण्यात येणा-या कोणत्याही कार्यक्रमाच्या/समारंभाच्या / उपक्रमाच्या बाबतीत जागेच्या क्षमतेच्या 50 % लोकांना परवानगी राहील.

ब. संपुर्ण खुल्या असलेल्या (open to sky) जागांच्या बाबतीत कोणत्याही समारंभासाठी किंवा संमेलनासाठी त्या जागेच्या क्षमतेच्या 25 टक्के लोकांना परवानगी असेल. संमेलनाच्या किंवा समारंभाच्या अशा ठिकाणांच्या बाबतीत क्षमता औपचारिकपणे पूर्वी निश्चित केली नसेल तर (स्टेडिअम प्रमाणे) स्थानिक प्रशासन यांना अशी क्षमता ठरवण्याचा अधिकार राहील.

क. जर वरील नियमानुसार कोणत्याही संमेलनासाठी (मेळाव्यासाठी) उपस्थित असलेल्या एकूण लोकांची संख्या एक हजारापेक्षा अधिक असेल तर, अशा बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास त्याबाबतची माहिती देणे आवश्यक राहील.अशा संमेलनाचे (मेळाव्याचे) निरीक्षक म्हणून पर्यवेक्षण करण्यासाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवावे व सदर ठिकाणी कोविड नियमावलींचे पालन होत आहे किंवा नाही याबाबत खात्री करावी. कोविड-19 चा प्रसार होण्याचा धोका लक्षात घेता त्या ठिकाणी कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास सदरच्या प्रतिनिधीस तो कार्यक्रम पूर्णत: किंवा अंशत: बंद करण्याचा अधिकार असेल.

5) लसीकरणाची व्याख्या : संपूर्ण लसीकरण झालेली व्यक्ती याचा अर्थ :- लसींच्या दोनही मात्रा (डोस) घेतलेल्या आहेत आणि दुसरी मात्रा (डोस) घेतल्यानंतर 14 दिवस झालेले आहेत अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा ज्या व्यक्तीचे वैद्यकिय स्थिती अशी आहे की, ज्यामुळे त्याला किंवा तीला लस घेण्यास मुभा नाही आणि त्या व्यक्तीकडे तशा अर्थाचे मान्यताप्राप्त डॉक्टरांकडील प्रमाणपत्र आहे अशी कोणतीही व्यक्ती असा आहे किंवा 18 वर्षापेक्षा कमी वयाची व्यक्ती असा आहे.

6) कोविड अनुरुप वर्तन विषयक नियम व दंड : 

व्याख्या : कोविड-19 विषाणूचा प्रसार होण्यास प्रतिबंध करण्यासाठी आणि त्यामुळे त्याच्या प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने व संस्थेने पालन करण्याची गरज असलेले दैनंदिन सामान्य वर्तन अशी कोविड होण्यास जे अडथळा निर्माण करु शकतील अशा सर्व तर्कसंगत पैलूंचा कोविड अनुरुप वर्तनांच्या पैलूमध्ये खालील बाबींचा देखील समावेश होतो.

अ.मुलभूत कोविड अनुरुप वर्तनाचे काही पैलू पुढील प्रमाणे असून त्यांचे प्रत्येकाने सदैव पालन केले पाहिजे. सर्व संस्थांनी हे सुनिश्चित करणे आवश्यक आहे की त्यांचे सर्व कर्मचारी, त्यांच्या परिसरात भेट देणारे अभ्यांगत, ग्राहक किंवा संस्थेच्या कोणत्याही कार्यक्रमात, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या सहभागी होणारी कोणतीही व्यक्ती, त्याचे पालन करतील आणि त्यांच्या परिसरामध्ये किंवा व्यवसायाशी संबंधित व्यवहार करतांना किंवा संबंधित संस्थेशी संबंधित असलेली अन्य कार्य करतांना त्याची अंमलबजावणी करण्याकरीता संस्था उत्तरदायी असतील. संस्था त्यांच्या नियंत्रणाखाली किंवा जेथे ती संस्था आपला व्यवहार किंवा इतर कार्य करत असेल अशा सर्व ठिकाणी अशा सर्व कर्मचा-यांनी कोविड अनुरुप वर्तनाचे पालन करण्यासाठी आवश्यक असलेल्या हॅण्ड सॅनिटाइजर, साबण व पाणी, तापमापक (Thermal Scanner) इत्यादी साहित्य उपलब्ध करण्यासाठी जबाबदार राहतील.

  1. नेहमी योग्य पध्दतीने मास्क परिधान करावा. नाक व तोंड नेहमी मास्कने झाकले पाहिजे. (मास्क म्हणून रुमाल वापरता येणार नाही आणि मास्क म्हणून रुमाल वापरणारी व्यक्ती दंडास पात्र राहील)
  2. शक्यतो सामाजिक अंतर 06 फुट ठेवण्यात यावे.
  3.  वारंवार साबणाने किंवा सॅनिटाइजरने हात स्वच्छ धुवावे.
  4.  साबणाने हात न धुता किंवा सॅनिटाइजर न वापरता नाक, डोळे, तोंड यांना स्पर्श करणे टाळावे.
  5.  श्वसन स्वच्छता योग्य राहील याची दक्षता घ्यावी.
  6.  नेहमी surfaces स्वच्छ ठेऊन निर्जंतुकीकरण करण्यात यावे.
  7. ,खोकतांना किंवा शिंकतांना टिश्यु पेपरचा वापर करुन तोंड व नाक झाकावे आणि वापरलेले टिश्यू पेपर योग्यरित्या नष्ट करावे. जर एखाद्या व्यक्तीकडे टिश्यु पेपर नसेल तर त्यांने शिंकतांना किंवा खोकतांना हाताच्या कोपरा वाकवून त्याचा वापर करावा.
  8. सार्वजनिक ठिकाणी थुकण्यास मनाई राहील.
  9.  सार्वजनिक ठिकाणी गर्दी करु नये व 6 फुट सुरक्षित अंतर राखावे.
  10. शुभेच्छा देतांना शारिरीक स्पर्श न करता नमस्कार / अभिवादन करावे.
  11. कोविड -19 विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी अन्य तर्कसंगत वर्तन.

ब) शास्ती :

1.कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला प्रत्येक प्रसंगी रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल.
2.ज्यांना आपले अभ्यागत, ग्राहक, इत्यादींवर कोविड अनुरुप वर्तन लादणे अपेक्षित आहे अशा संस्थेच्या किंवा आस्थापनेच्या कोणत्याही परिवास्तूत (जागेत) जर एखादया व्यक्तीने कसून केल्याचे निदर्शनास आले तर, त्या व्यक्तीवर दंडा लादण्याव्यतिरिक्त अशा संस्थांना किंवा आस्थापनांना सुध्दा रु. 10,000/- इतका दंड आकारता येईल. जर कोणतीही संस्था किंवा आस्थापना तिचे अभ्यागत, ग्राहक, इत्यादींमध्ये कोविड अनुरुप वर्तन विषयक शिस्त निर्माण /सुनिश्चित करण्यात नियमितपणे कसूर करित असल्याचे दिसून आल्यास कोविड -19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

3. जर एखादया संस्थेने किंवा आस्थापनेने स्वतच कोविड अनुरुप वर्तनाचे किंवा कोविड नियमावलीचे (SOP) उल्लंघन केल्यास त्या संस्थेस/आस्थापनेस प्रत्येक प्रसंगी रु. 50,000/- इतक्या दंडाची आकारणी करण्यास पात्र राहील. वारंवार कसूर केल्यास कोविड -19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत अशी संस्था किंवा आस्थापना बंद करण्यात येईल.

4. टॅक्सी किंवा खाजगी वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनात किंवा कोणत्याही बसमध्ये, कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करण्या-या व्यक्तीस रु. 500/- इतका दंड व सेवा पुरविणारे वाहनचालक, मदतनीस , किंवा ग्राहक यांना देखील रु. 500/- इतका दंड आकारण्यात येईल. बसेसच्या बाबतीत , मालक परिवहन एजन्सीज यांनी कसूर केल्यास प्रत्येक वेळेस रुपये 10,000/- मात्र दंड आकारण्यात येईल. वारंवार कसूर केल्यास कोविड -19 ची अधिसूचना अंमलात असेपर्यंत एजन्सीचा परवाना निलंबित किंवा रद्द करण्यात येईल. वर नमूद केल्याप्रमाणे कोविड अनुरुप वर्तनाचे उल्लंघन करण्या-या व्यक्ती / संस्था / घटक यांचेवर पोलीस विभाग व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था यांनी संयुक्तरित्या कारवाई करावी व सदरची रक्कम शासनाच्या दिनांक 26 ऑक्टोंबर, 2021 रोजीच्या आदेशात नमूद केल्यानुसार Revenue Receipt, (c) Other non-Tax Revenue, (1) General Services, 0070- Other Administrative Services, 800 Other Receipt या लेखाशिर्षाखाली शासन जमा करावी. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास सदर बाब ही भारतीय दंड संहिता, 1860 (45) चे कलम 188, आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 व फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 मधील तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहील. सदरचा आदेश हा आज दिनांक 27/11/2021 रोजी माझ्या सही व कार्यालयाचे शिक्क्यानिशी दिला असे.

 

अभिजीत राऊत
जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष,
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जळगाव

Leave A Reply

Your email address will not be published.